
हिंगोली दि १५ (प्रतिनिधी)- अनपेक्षितपणे शिंदे गटामध्ये सामील झालेले हिंगोलीचे आमदार संतोष बांगर अलिकडे सतत वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतात. आता तर त्यांनी निकृष्ट दर्जाचे मध्यान भोजन दिल्याने एका सरकारी अधिका-याच्या कानशिलात लगावली आहे. कामगार विभागाच्या मध्यान भोजन योजनेतील गैरप्रकाराचा आमदार संतोष बांगर यांनी भांडाफोड केला आहे. त्यावेळी हा प्रकार घडला.
हिंगोली जिल्ह्यात कामगार विभागामार्फत बांधकामांवरील कामगारांना मोफत मध्यान भोजन वाटप केले जाते. याच मध्यान भोजन योजनेतील गैरप्रकाराचा आमदार संतोष बांगर यांनी अचानक भेट देत भांडाफोड केला. हिंगोली शहराजवळील एमआयडीसी भागात जिल्ह्यातील कामगारांसाठी एकत्रित अन्न शिजवले जाते त्यानंतर तेथून हे अन्न जिल्हाभरातील कामगारांना वेगवेगळ्या ठिकाणी वितरीत केले जाते. बांगर यांना या जेवणाविषयी तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे आज आमदार बांगर यांनी प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. त्यावेळी ते अन्न अत्यंत निकृष्ट दर्जाचे आढळून आले आहे. बुरशीजन्य डाळी, भाज्या, करपलेल्या चपात्या आणि अन्न शिजवण्याच्या ठिकाणी घाण आढळून आल्याने बांगर चांगलेच संतप्त झाले आणि त्यांनी व्यवस्थापकाचा गाल लाल केला.
व्यवस्थापक उडवाउडवीची उत्तरे देत असल्यामुळे आपण हात उगारल्याचे बांगर यांनी सांगितले आहे.त्यांचा हा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे. याआधीही जो गद्दार बोलेल त्याच्या कानशिलात लगावा असेही बांगर म्हणाले होते. त्यामुळे या व्हिडिओची त्या बाजूनेही जोरदार चर्चा सुरु आहे.