सुट्टी नाकारल्याने या महिला उपजिल्हाधिकारीने दिला नोकरीचा राजीनामा
राजीनाम्याचे कारण चकित करणारे, लवकरच करणार राजकारणात प्रवेश, पक्षही ठरला?
भोपाळ दि २३(प्रतिनिधी)- अनेक तरुण तरुणींचे सरकारी सेवेत काम करण्याचे स्वप्न असते. यासाठी ते दिवस रात्र एक करुन काम करत असतात. पण आता एका अशी घटना घडली आहे, ज्यामुळे तुम्ही सुद्धा आवक व्हाल मध्यप्रदेश मधील एका उपजिल्हाधिकारी पदावर काम करणाऱ्या महिला अधिकाऱ्याने सुट्टी नाकारली म्हणून थेट राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे.
मध्य प्रदेशातील छतरपूर येथील एक उपजिल्हाधिकारी सध्या चर्चेत आहे. निशा बांगरे या उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या राजीनाम्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. निशा बांगरे यांनी सामान्य प्रशासन विभागाला पत्र लिहित २५ जून रोजी बैतूल जिल्ह्यातील आमला येथे त्यांच्या घराचा गृहप्रवेश सोहळा होणार असल्याचे नमूद करत प्रशासनाकडे रजा मागितली होती. मात्र प्रशासनाने त्यांच्या रजेचा अर्ज नाकारला. त्यामुळे संतापलेल्या बांगरे यांनी थेट राजीनामाच दिला आहे. आपल्या वैयक्तिक आणि धार्मिक भावना दुखावल्या असून त्यामुळेच आपण आपल्या पदाचा राजीनामा देत असल्यावे त्यांनी सांगितले आहे. निशा बांगरे या मध्य प्रदेशातील प्रसिद्ध अधिकारी आहेत. संविधानाला साक्षीदार मानून त्यांनी लग्न केले होते. याची जोरदार चर्चा झाली होती. २५ जून रोजी मध्य प्रदेशातील बैतुल येथील आमला इथे आंतरराष्ट्रीय सर्वधर्म शांती परिषद आणि जागतिक शांतता पुरस्काराचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीलंकेच्या कायदा मंत्र्यांसह ११ देशांतील सर्व धर्मांचे प्रतिनिधी शांतता पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. यामध्ये तथागत बुद्धांच्या अस्थीही श्रीलंकेतून आणण्यात येणार आहेत. याच कार्यक्रमाला जात येणार नसल्याने त्यांनी राजीनामा दिला आहे. निशा बांगरे सध्या छतरपूर जिल्ह्यातील लवकुश नगरमध्ये एसडीएम म्हणून तैनात होत्या.
मध्यप्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील लवकुशनगर येथील उपजिल्हाधिकारी निशा बांगरे यांची लवकरच राजकारणात एन्ट्री होणार आहे. त्या आमला विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविणार असल्याची चर्चा आहे. निशा बांगरे कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढविणार हे गुलदस्तात आहे.