एक महिन्याचा वेळ देतो ९ चा भोंगा बंद करा म्हणत संजय राऊतांना धमकी
एकाच दिवशी दोन राजकीय नेत्यांना जीवे मारण्याची धमकी, फडणवीसांच्या कार्यक्षमतेवर हल्लाबोल
मुंबई दि ९(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जिवे मारण्याच्या धमकीची घटना ताजी असतानाच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि त्यांचे बंधू सुनील राऊत यांनाही धमकी देण्यात आली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
संजय राऊत यांनी सकाळी ९ वाजताचा भोंगा बंद करावा, त्यासाठी एक महिन्याचा वेळ देत असल्याचे या फोनवर सांगण्यात आले आहे. हा फोन सुनील राऊत यांच्या फोनवर आला. संबंधित व्यक्ती हिंदी भाषेत बोल असल्याची माहिती त्यांनी दिली. यामध्ये संबंधित व्यक्ती सातत्याने सकाळी नऊ वाजताचा भोंगा बंद करा, अस इशारा देत होती, असे राऊत यांनी तक्रारीत सांगितले आहे. संजय राऊत यांना आधीही धमक्या देण्यात आल्या होत्या. या प्रकरणात पुणे गुन्हे शाखेने एका संशयित आरोपीला ताब्यात घेऊन मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा दोन महिन्यांनंतर धमकी आल्याने खळबळ उडाली आहे. या घडामोडींवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पहिल्या वेळेला मला धमकी आली होती. त्याची माहिती मी गृहमंत्र्यांना दिली होती. तेव्हा त्यांची चेष्टा केली. गृहमंत्री धमकी गांभीर्याने घेत नसेल आणि चेष्टा करत असेल तर त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार, हा सरकार प्रायोजित दहशतवाद आहे असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे. एकाच दिवशी दोन खासदारांना धमकी आल्याने राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शरद पवार यांनाही तुमचा दाभोळकर करू अशी धमकी देण्यात आली आहे.
राजकीय पातळीवर मतभेद असतील पण मनभेद नाहीत. कोणत्याही नेत्याला धमकी येणं खपवून घेणार नाही. कायद्याप्रमाणे पोलीस निश्चित कारवाई करतील. सभ्यतेच्या मर्यादा पार करणे खपवून घेणार नाही. अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. आता गृह विभाग या धमकी प्रकरणावर काय कारवाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.