मुंबई दि ३(प्रतिनिधी)- मुंबई शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घाटकोपर परिसरातील एका मॉलमध्ये घसरगुंडीवर खेळताना एका साडेतीन वर्षीय चिमुरडीचा मृत्यू झाला आहे. आईच्या डोळ्यादेखत घडलेला हा प्रसंग सीसीटीव्हीत देखील कैद झाला आहे. दालीशा असे त्या चिमुकलीचे नाव आहे.
मुंबईतील घाटकोपरच्या नील योग मॉलमध्ये किड्स झोनमध्ये खेळत असताना तोल जाऊन या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. दालिशा करण वर्मा ही आई वडिलांसोबत घाटकोपरमधील नील योग मॉलमध्ये गेली होती. तिथे किड्स झोन झेनोक्स प्ले स्पेस याठिकाणी ती खेळण्यासाठी गेली. तिथे ती किड्स झोनमध्ये घसरगुंडी खेळत असताना अचानक तिचा तोल गेला आणि ती खाली पडली. या घटनेत तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ती बेशुद्ध पडली. त्यानंतर तिला तात्काळ मुलुंडच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टर तिच्यावर उपचार करत असतानाच चिमुकलीने जीव सोडला. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. अनेकांनी त्याबद्दल हळहळ व्यक्त केली आहे.
दालिशा वर्मा ही चेंबूरच्या टिळकनगर परिसरात राहत होती. ती तिच्या आई-वडिलांसह घाटकोपरच्या नील योग मॉलमध्ये गेली होती. जिथे ही दुर्घटना घडली आहे. या घटनेने दालिशाच्या पालकांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे लहान मुलांकडे लक्ष देण्याची गरज आहे.