
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज २७ वा वर्धापन दिन साजरा होत आहे. मात्र, पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकस्मात निधनानंतरचा हा पहिलाच वर्धापन दिन असल्याने संपूर्ण पक्ष, कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये अत्यंत भावनिक वातावरण पाहायला मिळत आहे.

राजकीय उलथापालथ आणि दुर्दैवी अपघात

काही वर्षांपूर्वी राज्यात झालेल्या राजकीय घडामोडींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली होती. त्यानंतर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाने महायुतीत सहभाग घेतला होता. तेव्हापासून शरद पवार गट आणि अजित पवार गट अशा दोन स्वतंत्र गटांकडून वर्धापन दिन साजरा केला जात होता. मात्र, यावर्षी जानेवारी महिन्यात बारामतीजवळ झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचे दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या या अकाली जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला होता. पवार कुटुंबासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसाठी हा कधीही भरून न निघणारा मोठा धक्का होता.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
राष्ट्रवादी काँग्रेसच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक अत्यंत भावूक पोस्ट शेअर केली आहे. अजितदादांच्या आठवणींना उजाळा देत त्यांनी कार्यकर्त्यांना नवा संकल्प करण्याचे आवाहन केले आहे.”आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७व्या वर्धापन दिनानिमित्त दादांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करत, त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार करूया,” असे सुनेत्रा पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
सुनेत्रा पवारांच्या पोस्टमधील महत्त्वाचे मुद्दे
शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा आणि स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांनी घालून दिलेल्या सुसंस्कृत राजकारणाच्या पायावर पक्ष उभा आहे.सभागृहात भाषणं होतील, कार्यकर्त्यांचे मेळावे होतील, पक्षाचा झेंडा तितक्याच अभिमानानं फडकेल, पण प्रत्येक क्षणी एक पोकळी जाणवत राहील. कारण आज आदरणीय अजित दादा आपल्यात नाहीत…दादा हे केवळ नेते नव्हते, तर कार्यकर्त्यांच्या सुख-दुःखात धावून जाणारे आणि चूक झाली तर कान धरून समजावणारे ‘आधारवड’ होते.
प्रगत महाराष्ट्रासाठी नव्या जोमाने काम करण्याचा संकल्प
सुनेत्रा पवार यांनी आपल्या पोस्टच्या शेवटी कार्यकर्त्यांना आवाहन करताना म्हटले आहे की, दादांनी दाखवलेल्या विकासाच्या मार्गावर चालणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन अधिक सक्षम, समृद्ध आणि प्रगत महाराष्ट्र घडवण्यासाठी सर्वांनी नव्या जोमाने काम करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी पक्ष परिवाराला केले आहे.

