ठाकरेंचे निष्ठावंत म्हणवणारे तीन नेते शिंदे गटात जाणार?
पक्ष बांधणी करणाऱ्या उद्धव ठाकरेंना शिंदे जोरदार धक्का देणार
मुंबई दि ८ (प्रतिनिधी) – दादरमधील शिवाजी पार्कच्या मैदानावरील दसरा मेळाव्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात रस्सीखेच सुरू आहे. अशातच दसरा मेळाव्यात शिंदे गट ठाकरेंना मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. शिवसेनेचे १०-१५ नेते शिंदे गटात जात ‘सीमोल्लंघन’ करणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे ठाकरेंच्या गोटात अस्वस्थता आहे.
शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांच्या गटातील एक खासदार, दोन आमदार आणि मुंबईचे पाच ते दहा माजी नगरसेवक शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा आहे. या सर्वांना महामंडळांवर देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. आधी ४० आमदार, मग १२ खासदार, काही माजी नगरसेवक शिंदे गटात दाखल झाले. आता एक खासदार आणि दोन आमदारही त्यात सहभागी झाल्यास हा आकडा वाढून ४२ आमदार, १३ खासदार असा होणार आहे. खासदार गजानन कीर्तिकर आमदार राजन साळवी, वैभव नाईक आणि काही माजी नगरसेवक शिंदे गटात जाणार आहे. तिन्ही नेते ठाकरेंचे निष्ठावांत म्हटले जात होते. पण ते आता शिंदे गटात जाणार असल्याने त्यांच्यासोबत अनेक पदाधिकारी-शिवसैनिक जाण्याची शक्यता आहे. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह यावर दावा सांगितलेला असतानाच आता शिवसेना, ठाकरे आणि दसरा मेळावा हे समीकरणही संपवण्याचा प्रयत्न शिंदे गट करताना दिसत आहे.त्यासाठी न्यायालयाचे दरवाजे शिंदे गट ठोठावणार आहे.
प्रथम अर्ज करणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर शिवाजी पार्कच्या मैदानावर परवानगी दिली जात असल्यामुळे ठाकरेंचे पारडे जड मानले जाते. त्यामुळे शिंदे गटाने शिवाजी पार्क मैदानच गोठवण्याची तयारी केल्याचे समजते.पण तीन शिलेदार शिंदे गटात आल्यास उद्धव ठाकरे समोरच्या अडचणी वाढणार आहेत.