Latest Marathi News
Ganesh J GIF

पुण्यात मित्राच्या त्रासाला कंटाळून तरुणाची गळफास घेत आत्महत्या

सुसाईड नोट लिहित संपवले जीवन, नामांकित काॅलेजमधील घटना, रँगिगची शक्यता?

पुणे दि १३ (प्रतिनिधी)- पुणे शहरातील डेक्कन परिसरात मराठवाडा मित्र मंडळ लॉ कॉलेजमध्ये तिसर्‍या वर्षाला शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. राज रावसाहेब गर्जे असे मृताचे नाव आहे. मित्राला पैसे हवे असल्याने राजने मध्यस्थी केली होती. मात्र, मित्राने पैसे परत न दिल्याने त्याने आत्महत्या केल्याची माहिती आहे.

चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात राज याचे वडील रावसाहेब गर्जे यांनी तक्रार दिली आहे. तर  आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी निरूपम जोशी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज रावसाहेब गर्जे असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव असून तो पुण्यातील नामांकित कॉलेजमध्ये तिसर्‍या वर्षात शिकत होता. राज याच्या मध्यस्थीने आरोपी निरूपम जयवंत जोशी याला काही पैसे उसने दिले होते. परंतु ते पैसे निरुपम जोशी परत देत नव्हता, त्यामुळे तो मानसिक तणावात आला होता. याच तणावातून राजने आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. राज दोन वर्षांपासून वसतीगृहात राहत होता. त्याची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. त्याचे वडील शेती करतात, तर दोन भाऊ पुण्यात काम करतात. राज अभ्यासात हुशार होता. महाविद्यालय तसेच वसतिगृहाच्या कार्यक्रमात तो सहभागी व्हायचा. परीक्षा संपल्यानंतर तो वसतिगृहात गेला. तेथे त्याने मित्रांशी गप्पा मारल्या. त्यानंतर तो खोलीत गेला. त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. राजच्या खोलीचा दरवाजा बंद होता. त्याच्या मित्रांनी दरवाजा वाजविला. मात्र, त्याने प्रतिसाद दिला नाही. मित्रांनी खिडकीतून डोकावून पाहिले. तेव्हा राजने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. दरम्यान पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहे, असे चतुःश्रुंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी सांगितले. तर मयत राज याचा भाऊ म्हणाला की, या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला पाहिजे आणि पैश्यासाठी आमचा भाऊ हा आत्महत्या करू शकत नाही. तुर्तास पोलीस या घटनेच्या सर्व बाजूंनी तपास करत आहेत.

आत्महत्या करण्यापूर्वी त्याने एक चिठ्ठी लिहून ठेवली असून निरुपम जोशी याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक संतोष कोळी तपास करीत आहेत. आजकाल तरुणाईमध्ये आत्महत्यांचे प्रमाण खूप वाढले आहे. अगदी छोट्या कारणातून तरुण मुले आत्महत्येचा विचार करत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!