ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी या मतदारसंघातून लोकसभा लढवणार?
मतदारसंघही ठरला? या पक्षाकडून लढणार निवडणुक? कुस्तीचा आखाडा जिंकल्यानंतर चाैधरी आता राजकारणाची कुस्ती जिंकणार का?
जळगाव दि २(प्रतिनिधी) – लोकसभा निवडणुका जवळ आल्यामुळे प्रत्येक पक्ष विजयी होणाऱ्या उमेदवाराची चाचपणी करत आहेत. त्यातच भाजपा हा महाराष्ट्रात मिशन ४५ चे लक्ष्य बागळत कामाला लागला आहे. त्यामुळे भाजपाने आपल्या उमेदवारांचा अंतर्गत सर्व्हे केला आहे. यात काही विद्यमान खासदारांविरोधात नाराजीचा सुर आहे. त्यामुळे त्यांच्या विजयाची खात्री नाही. अशा ठिकाणी नव्या उमेदवारांचा शोध घेतला जात आहे. त्यामुळे जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून महाराष्ट्र केशरी मैदानात उतरणार आहे.
जळगाव लोकसभा मतदारसंघातील खासदार भाजपचे उन्मेष पाटील खासदार आहेत. भाजप उन्मेष पाटील यांना पर्याय शोधत असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून आहे. मध्यंतरी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नावाची चाचपणी करण्यात आली होती. पण आता ट्रिपल महाराष्ट्र केसरी राहिलेला पैलवान विजय चौधरी लोकसभा निवडणूकीच्या आखाड्यात उतरणार आहेत. विजय चौधरी यांना राजकारणात कोणत्या पक्षाकडून ऑफर आली आहे का? यावर बोलताना सांगितले की, अद्याप कुठल्याच पक्षाची आपणास ऑफर नाही. मात्र भारतीय जनता पक्ष आपला आवडता पक्ष आहे. त्या पक्षाकडून संधी मिळाल्यास आपण लोकसभा निवडणूक लढण्यास तयार आहोत असे चाैधरी म्हणाले आहेत. विजय चौधरी यांचं चाळीसगाव तालुक्यातील सायगाव हे गाव आहे. यामुळे जळगाव लोकसभा मतदारसंघात जर संधी मिळाली तर नक्कीच निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे भाजपा चाैधरी यांना संधी देणार की पुन्हा एकदा पाटील यांच्यावर विश्वास दाखवणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान विजय चौधरी यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात चाैधरी यांच्या नावाला पसंती दिली जात असल्याने आणि अंतिम क्षणी धक्कातंत्राचा वापर करण्यात भाजपा तरबेज असल्यामुळे हा सस्पेन्स कायम राहणार आहे.
विजय चौधरी यांची २०१७ मध्ये राज्य सरकारकडून पोलीस उपअधिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती. सध्या ते पुणे पोलीस दलात लाचलुचपत प्रतिबंधक विभागामध्ये कार्यरत आहेत. त्यांनी २०१४, २०१५ आणि २०१६ मध्ये सलग तीन वेळा महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली आहे. तसेच इतर अनेक मानाच्या कुस्त्यां आणि अनेक राष्ट्रीय सुवर्णपदकावर देखील विजय चौधरी यांनी मोहोर उमटवली आहे.