
महिला पोलिसाच्या अंगावर दुचाकी घालत चिरडण्याचा प्रयत्न
वकीलाच्या कारनाम्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल
मुंबई दि ३०(प्रतिनिधी) – पालघरच्या नालासोपारा भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. पाटणकर पार्क येथे एका जोडप्याने ड्युटीवर असलेल्या महिला पोलिसाला दुचाकीने चिरडण्याचा प्रयत्न करत पळून जाण्याचाही प्रयत्न केला पण पोलीसांनी त्यांना शिताफीने अटक केली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे आरोपी हा पेशाने वकील आहे. या अपघातात महिला पोलिसाच्या हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी बृजेश कुमार भालौरियाने आपली दुचाकी नो-पार्किंग झोनमध्ये लावली होती. यानंतर वाहतूक पोलिसांनी कारवाई करून ही दुचाकी गोदामात जमा केली. हे कळल्यानंतर बृजेश आणि त्यांची पत्नी डॉली गोदामात पोहचले आणि पोलिसांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी प्रज्ञा दळवी ड्युटीवर होत्या. वाद घालतच त्यांनी पोलिसाच्या अंगावर दुचाकी घालण्याचा प्रयत्न केला.या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. ब्रिजेश दंड न भारताच आपली दुचाकी घेऊन जात होता. त्याने महिला पोलिसाला फरपटत नेण्याचाही प्रयत्न केला, मात्र तो यशस्वी झाला नाही. अखेर पोलीसांनी त्याला अटक केली आहे.
बृजेशने दुचाकीने दळवी यांना चिरडण्याचा प्रयत्न केला. यामुळे दळवी यांच्या हाताला आणि पायाला गंभीर दुखापतही झाली आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी यावर संताप व्यक्त केला आहे. तसेच आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.