चिंचवड पोट निवडणूकीत महाविकास आघाडीत बिघाडीमुळे ट्विस्ट
शिवसेनेचे राहुल कलाटे अपक्ष लढणार, नाना काटे अडचणीत, जगतापांचा मार्ग सोपा?
पुणे दि ७(प्रतिनिधी) – भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर पुण्यातील चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. भाजपकडून आश्विनी जगताप यांनी अर्ज भरला आहे. पण महाविकास आघाडीला बंडखोरीचा फटका बसल्याने चिंचवडमध्ये तिरंगी लढतीची शक्यता आहे. यामुळे चिंचवड निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे.
चिंचवड पोटनिवडणूकीत राष्ट्रवादीकडून नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पण त्यामुळे नाराज असलेल्या आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय राहुल कलाटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राहुल कलाटे यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. परंतु आता राष्ट्रवादीनं नाना काटे यांना उमेदवारी जाहीर केल्यामुळे कलाटे नाराज आहेत. कलाटे यांनी २०१४ ची विधानसभा शिवसेनेकडून तर २०१९ साली अपक्ष म्हणून लढत दिली होती. त्यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांना कडवी झुंज दिली होती. मी महाविकास आघाडीतील तीनही पक्षांकडे उमेदवारी मागितली होती. मात्र, मला उमेदवारी मिळू शकली नाही. गेल्या दोन निवडणुकीत मी निकराची झुंज दिली होती. त्यामुळे मलाच मतदार सहानुभूती दाखवतील असा विश्वास मला आहे.” अशी प्रतिक्रिया कलाटे यांनी दिली आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेत नगरसेवक असलेले कलाटे यांच्याकडे पिंपरी चिंचवड मधील शिवसेनेचे गटनेतेपद आहे. कलाटे यांच्यामुळे तिरंगी लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.त्यामुळे महाविकास आघाडीच्या अडचणी वाढल्या आहेत. दरम्यान आमदार सुनिल शेळके यांच्यावर कलाटे यांच्या मनधरणीची जबाबदारी देण्यात आली आहे. पण कलाटे ठाम आहेत.