अभिजित बिचुकले आणि लहुजी छावा संघटनेचे कार्यकर्ते भिडले
बिचुकलेंच्या वादाचा व्हिडिओ व्हायरल, कसब्यातून बिचुकले निवडणुक रिंगणात?
पुणे दि ७(प्रतिनिधी)- भाजपाच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कसबा विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. या निवडणूकीत आता अभिजित बिचुकले यांची एंट्री झाली आहे. पण आज लहुजी शक्ती सेना आणि बिचुकले यांच्यात वाद झाल्याने तणाव निर्माण झाला होता.
कसबा विधानसभा निवडणूकीत अभिजित बिचुकले यांनी अर्ज दाखल केला आहे. आज बिचुकले निवडणूक आयोगाच्या कार्यालयात आले होते. त्यावेळी लहुजी छावा संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी अभिजित बिचुकले यांच्यासोबत फोटो काढण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा अभिजित बिचुकले यांनी संघटनेच्या कार्यकर्त्यांना फोटो काढायचा असेल तर गळ्यातील लहुजींचा रुमाल काढावा लागेल असे बजावले. त्यामुळे कार्यकर्त्यांना राग आला. तिथेच लहुजी छावा संघटनेचे अध्यक्ष सचिन इंगळे आणि अभिजित बिचुकले यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. पण तिथे उपस्थित काही लोकांनी मध्यस्थी केल्याने हा वाद मिटवण्यात आला. पण यामुळे बिचुकले आणि वाद हे समीकरण पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. पण वादामुळेच अभिजित बिचुकले प्रसिद्ध झाले आहेत.
अभिजित बिचुकले यांनी यापूर्वी आमदारकी, खासदारकीपासून ते अगदी राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवली आहे. २०१९ साली त्यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. पण कसबा पोटनिवडणूकीत अलंकृता बिचुकले उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता आहे.