
मोठी बातमी! भाजपाच्या दोन आमदाराची पक्षातून हकालपट्टी
पक्षाच्या विरूद्ध काम केल्याचा ठपका, ती कृती ठरली कारण, कोण आहेत ते आमदार
बेंगलोर – कर्नाटक भाजपाने आपल्याच पक्षातील दोन आमदारांवर मोठी कारवाई केली आहे. पक्ष शिस्तीचा भंग केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली आहे. कर्नाटक भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी ही घोषणा केली आहे.
कर्नाटकातील यशवंतपूरचे आमदार एस.टी. सोमशेखर आणि येल्लापूरचे आमदार ए. शिवराम हेब्बर यांच्यावर पक्षाने ही कारवाई केली आहे. भाजपने केलेल्या या कारवाईने कर्नाटकच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. पक्षविरोधी कृत्य केल्याप्रकरणी भाजपाच्या केंद्रीय शिस्तपालन समितीने ए. शिवराम हेब्बार आणि एसटी सोमशेखर यांच्यावर कारवाई केली आहे. फेब्रुवारी २०२५ मध्ये कर्नाटकमध्ये राज्यसभेच्या चार जागांसाठी निवडणूक घेण्यात आली होती. त्यासाठी मतदान झाले. या निवडणुकीत चारपैकी तीन जागा काँग्रेसने जिंकल्या तर केवळ एक जागा भाजपाने जिंकली होती. त्यामुळे या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग करण्यात आल्याचे प्रकरण समोर आले होते. भाजपाने या निवडणुकीसाठी व्हीप जारी केला होता. पण, तरी देखील भाजपच्या या दोन्ही आमदारांनी काँग्रेसचे उमेदवार अजय माकन यांना मतदान केल्याचे उघडकीस आले. आपल्याच पक्षाच्या दोन्ही आमदारांनी पक्षाविरोधात जाऊन काँग्रेसच्या आमदाराला मतदान केल्याचे उघडकीस येताच भाजपाने दोन्ही आमदारांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. दोन्ही आमदारांनी पक्षविरोधी कृत्य केल्याचे आरोप फेटाळून लावले होते. पण, पक्षाने दोघांनाही दोषी ठरवत सहा वर्षांसाठी भाजपतून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला. याआधी विजापूरचे आमदार बसवराज पाटील यत्नाळ यांच्यावर पक्षाने कारवाई केली होती. बंडखोर आमदार एस. टी. सोमशेखर आणि शिवराम हेब्बार हे कधीकाळी काँग्रेसचेच नेते होते. पण गेल्यावेळी त्यांनी भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतला होता.
भाजप शिस्तपालन समितीने केंद्रीय समितीला एक अहवाल सादर केला होता, ज्यामध्ये आमदार एस.टी. सोमशेखर आणि शिवराम हेब्बार यांना पक्षातून काढून टाकण्याची शिफारस करण्यात आली होती. आता यावर राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.