Latest Marathi News
Ganesh J GIF

सातार्‍यात तिरंगी लढत होणार का, उदयनराजे भोसले उमेदवारी अर्ज भरणार? चर्चा सुरू

सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीतून भाजपची उमेदवारी मिळणार की मिळणार नाही, ही चर्चा बाजूला ठेवून खासदार उदयनराजे भोसले यांनी उमेदवारीची 25 हजार रुपये अनामत रक्कम सोमवारी भरली.ते गुरुवारी (दि. 18) उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

भाजपकडून उमेदवारीचा निर्णय झाला नसतानाही, उदयनराजे यांनी प्रचार सुरू केला आहे. त्यांची जिल्ह्यात अखंड भ्रमंती सुरू आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होऊन तीन दिवस झाले असून, महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांनी सोमवारी जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला. मात्र, महायुतीचा उमेदवार जाहीर झाला नसल्याने, उदयनराजेंना उमेदवारी मिळणार का, याची उत्सुकता ताणली गेली आहे. मात्र, तेे दि. 18 रोजी उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे समजते.

उदयनराजे भोसले यांनी दोन दिवसांपूर्वीच उमेदवारी अर्ज खरेदी केला होता. त्यासाठी लागणारी 25 हजार रुपयांची अनामत रक्कम सोमवारी भरली. त्यातून कोणत्याही परिस्थितीत लोकसभेच्या रणांगणात उतरण्याचा आपला इरादा त्यांनी स्पष्ट केला आहे. भाजपने उमेदवारांच्या दहा याद्या प्रसिद्ध केल्या असल्या, तरी त्यामध्ये उदयनराजे भोसले यांचे नाव अजूनही आलेले नाही. कोल्हापूरमधील राजांना घरी जाऊन तिकीट दिले जाते; परंतु सातार्‍यात उदयनराजेंना महायुतीच्या तिकिटासाठी ताटकळावे लागत आहे, हे त्यांच्या कार्यकर्त्यांना अस्वस्थ करणारे आहे.

या स्थितीत आपल्याला उमेदवारी मिळणारच, असा ठाम विश्वास बाळगून, उदयनराजे मतदारसंघाचा कानाकोपरा पिंजून काढत आहेत. महायुतीकडून उदयनराजेंचा अर्ज भव्य शक्तिप्रदर्शनाने भरला जाणार आहे. त्याची तयारी सुरू आहे, असेही सांगण्यात येत आहे. एकंदरीत उदयनराजेंचा आवेश पाहता, सातार्‍यात त्यांच्यात आणि शशिकांत शिंदे यांच्यात सामना रंगणार, हे जवळपास निश्चित आहे. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम जाधव यांनीसुद्धा ‘आता नाही, तर कधीच नाही’ असा स्टेटस सोशल मीडियावर ठेवल्याने, तेसुद्धा अपक्ष म्हणून शड्डू ठोकू शकतात. जाधव हेदेखील येत्या दोन-तीन दिवसांत उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे समजते. त्यामुळे सातार्‍यात तिरंगी लढत होणार का, याची चर्चा सुरू आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!