लग्नाचा दबाव टाकत पुण्यात दोन बहिणींचे अपहरण
तरुणीसह कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी, दोन आरोपींना अटक
पुणे दि २१(प्रतिनिधी)- पुण्यात वाढती गुन्हेगारी चिंतेचा विषय ठरत आहे.कोयता गॅंगची दहशत कायम असतानाच आता पुण्यात अपहरणाच्या देखील घटना घडत असल्याने पोलीसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पण नागरिकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
विवाहासाठी पुण्यातील स्वारगेटमधून एका तरुणीचे आणि तिच्या बहिणीचे अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. स्वारगेट परिसरातील जेधे चौकात ही धक्कादायक घटना घडली आहे. पोलीसांनी सोमनाथ सुनील सूळ, व गणेश बापुराव महानवर यांना अटक केली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी तरुणी आणि सोमनाथ सूळ हे एकमेकांच्या ओळखीचे होते. तसेच त्यांच्यात प्रेमसंबंध देखील होते. पण नंतर त्यांच्यात वाद झाल्याने प्रेम संबंध संपुष्टात आले. फिर्यादी तरूणीने दुसरीकडे लग्न केले पण तिचा घटस्फोट झाला. त्यामुळे सोमनाथ तिला लग्नासाठी समजावत होता. घटनेच्या दिवशी सोमनाथने फिर्यादीच्या कंपनीत फोन करून तिला धमकावून स्वारगेटला भेटण्यास बोलावले, ती आपल्या बहिणीसह त्याठिकाणी गेली असता, लग्नासाठी धमकावत अपहरण केले.दुस-या दिवशी त्यांना सदाशिव पेठेत सोडत याची वाच्यता केल्यास कुटुंबियांना मारण्याची धमकी दिली.
घाबरलेल्या तरुणीने सोमनाथ आणि गणेश विरोधात स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी त्यांच्यावर विनयभंग, अपहरण, धमकावणे या कलमांन्वये गुन्हा दाखल करत अटक केली आहे. या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक जमदाडे पुढील तपास करत आहेत.