मुंबई दि ७ (प्रतिनिधी) – एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेना चांगलीच अडचणीत सापडली आहे. शिवसेनेच्या इतिहासातलं सगळ्यात मोठं बंड करताना ५५ पैकी ४० आमदार तसंच १९ पैकी १२ खासदारांना सोबत घेत एकनाथ शिंदे यांनी थेट शिवसेना पक्षावरच दावा सांगितला आहे. त्यासाठीची न्यायालयीन लढाई सुरू आहे. पण आता झाल गेल विसरत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे लवकरच एकत्र येणार आहेत.
२० जूनला विधानपरिषद निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे शिवसेना आमदारांना घेऊन पहिले सुरत आणि मग गुवाहाटीला गेले, यानंतर महाराष्ट्रात सत्तानाट्य घडलं. याच्या दोन महिन्यांनी शिंदे आणि ठाकरे एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नवी मुंबईमध्ये उभारण्यात येणाऱ्या तिरुपती बालाजी मंदिराच्या भुमीपूजनाला एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता आहे. २१ ऑगस्टला नवी मुंबईमध्ये बालाजी मंदिराच्या भुमीपुजनाचं निमंत्रण मंदिराच्या विश्वस्तांनी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यासह ठाकरे कुटुंबालाही दिलं आहे. देवस्थान समितीच्या पदाधिकाऱ्यांनी ५ ऑगस्टला शिंदे, फडणवीस आणि ठाकरे यांची भेट घेतली. तसंच त्यांना भुमीपुजनाच्या कार्यक्रमाचं आमंत्रणही दिलं आहे.
२१ ऑगस्टला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे मंदिराच्या भुमीपूजन सोहळ्याला एकाच व्यासपीठावर येणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. या दोघांनी कार्यक्रमाला हजेरी लावली तर शिवसेनेतल्या बंडानंतर दोन्ही नेते पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत.