उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना जोरदार धक्का?
उच्च न्यायालयात शिंदे फडणवीस सरकारची कोंडी, राज्यपाल नियुक्त आमदारांबाबत मोठा निर्णय
मुंबई दि ३१(प्रतिनिधी)- राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचा तिढा पुन्हा एकदा वाढला आहे. कारण उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे शिंदे सरकारची कोंडी झाली आहे. एकीकडे शिंदे, फडणवीस आणि अजित पवार राज्यपाल नियुक्त आमदारासाठी आपल्या पक्षातील नेत्यांची वर्णी लावण्यासाठी प्रयत्न करत असताना, त्यांना धक्का देणारी माहिती समोर आली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेना धक्का दिला आहे.
उच्च न्यायालयात आज राज्यपाल नियुक्त आमदारांच्या याचिकेवर निर्णय देताना न्यायालयाने ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिफारस केलेल्या १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत परिस्थिती जैसे थे राहील असे निर्देश दिले आहेत. राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचं प्रकरण मागच्या ३ वर्षांपासून प्रलंबित आहे. या प्रकरणी आज न्यायालयाने राज्य सरकारला याविषयी आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.संपूर्ण प्रकरणाची सुनावणी आता २१ ऑगस्ट रोजी पार पडणार आहे. त्याचबरोबर न्यायालयाने राज्य सरकारला त्यांचं मत १० दिवसांत स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणातील मुख्य याचिकाकर्ते रतन सोली यांना याचिका मागे घेण्यासाठी सुप्रीम कोर्टाने मुभा दिली होती. परंतु याचिकाकर्ते सुनील मोदी यांना उच्च न्यायालयात दाद मागायची असल्यास मागा, असं म्हटलं होतं. त्याप्रमाणे त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेली १२ राज्यपाल नियुक्त आमदारांची दिलेल्या यादीवर सर्वप्रथम निर्णय व्हावा. त्यानंतर आलेल्या यादीचा विचार केला जावा,असं याचिकाकर्ते सुनिल मोदी यांनी म्हटले आहे. शिंदे-फडणवीस सरकारकडून नवीन यादी सादर करण्याची तयारी सुरू झाली. राज्यपाल नियुक्त नावांसाठी दोन्हींकडून जोरदार लॉबिंग सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. परंतु आमदारांचं संख्याबळ पाहता भाजपला १२ पैकी ८ तर शिंदे गटाला ४ जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जून २०२० पासून विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचं प्रकरण प्रलंबित आहे. सुप्रीम कोर्टामध्ये या प्रकरणाच्या सुनावण्या झालेल्या आहेत. येत्या बुधवारी पुन्हा सुनावणी होणार आहे. कोर्टाच्या कचाट्यात सापडलेलं हे प्रकरण हायकोर्टात आलेलं आहे.