
हरिद्वारमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे ज्याने सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले.एका किशोरवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीला पोलीसांनीआपल्या ताब्यात घेतले होते. पण पुढे पोलिसांच्याच निष्काळजीपणामुळे आरोपीने शिताफीने अधिकाऱ्यांना चकमा देत हातकड्यांसह आपला पळ काढला.

काय आहे प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री महाराष्ट्रातील तळोजा पोलीस ठाण्याचे एपीआय प्रसाद डोंगर यांनी त्यांचे सहकारी पीएन एम खेडकर, महेश पाटील आणि उमेश पाटील यांच्यासह महाराष्ट्रातील मुंबई, खारवाला येथील रहिवासी आरोपी अमित ब्रह्मानंद याला पोलीस कोठडी रिमांडसाठी डेहराडूनला आणले होते. तपासानंतर ते हरिद्वारमधील हॉटेलमध्ये थांबले. रात्रीच्या प्रहरी जेव्हा सर्व अधिकारी झोपत गुंगले तेव्हाच आरोपीने संधीचा फायदा घेत हाॅटेलमधून गुपचूप पळ काढला.

बुधवारी सकाळी पोलिसांना जाग आल्यानंतर हा प्रकार लक्षात आला आणि एकच खळबळ उडाली. तत्काळ या घटनेची माहिती हरिद्वार पोलिसांना देण्यात आली. दरम्यान, हरिद्वार पोलिसांनी दिवसभर आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र अद्याप त्याचा काहीही मागमूस लागलेला नाही. महाराष्ट्र पोलिसांचे एपीआय प्रसाद डोंगर यांनी पोलिसांना सांगितले की, आरोपी अमितवर अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा आरोप आहे. आरोपीला पीसीआरमधून डेहराडूनला आणण्यात आले होते. मात्र डेहराडूनमधून ट्रेन नसल्याने त्याला हरिद्वारला आणण्यात आले. इथून ते महाराष्ट्रासाठी रवाना होणार होते.

