
राजकारणात उलथापालथ! मुख्यमंत्री बदलाच्या प्रक्रियेला वेग?
आमदारांमध्ये मोठा असंतोष, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची राज्याकडे धाव? ते शंभर नाराज आमदार कोणत्या गटाचे?
बंगरुळू – कर्नाटकमधील काँग्रेस सरकारमध्ये अंतर्गत नाराजीचं वादळ उठले असतानाच पक्षाचे वरिष्ठ नेते आणि काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस रणदीप सिंग सुरजेवाला दोन दिवसांच्या दौर्यावर बेंगळुरूत दाखल होत आहेत. त्यानंतर कर्नाटकातील नेतृत्व बदल होणार असल्याचे बोलले जात आहे.
कर्नाटक काँग्रेसमध्ये सर्वकाही आलबेल असल्याचे दाखविले जात असले तरी अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. मुख्यमंत्री बदलाच्या चर्चां सुरु झाल्या आहेत. उपमुख्यमंत्री डी. शिवकुमार यांच्यामागे काँग्रेसचे १०० हून अधिक आमदार असल्याचा दावा समर्थकांकडून केला जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांच्यावर टांगती तलवार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. राज्यात पुढील काही महिन्यांत परिवर्तन होणार असल्याचे तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यातच काँग्रेसचे आमदार इक्बाल हुसैन हे मागील काही दिवसांपासून नेतृत्व बदलाचे संकेत देणारी विधाने करत आहेत. केवळ मीच नाही तर १०० हून अधिक आमदारांना बदल हवा आहे. अनेकजण या क्षणाची वाट पाहत आहे. त्यांना सुशासन हवे आहे. शिवकुमार यांना एक संधी मिळायला हवी, असे त्यांना वाटते. त्यांनी पक्षासाठी अथकपणे काम केले आहे. संघटना मजबूत करण्यात त्यांची भूमिका महत्वाची आहे, असे हुसैन म्हणाले आहेत.त्यामुळे काँग्रेसमध्ये बदल होणार या चर्चेला उधान आले आहे. कर्नाटकात २०२३ मध्ये काँग्रेस सरकार स्थापन होताना दोन्ही नेते अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद वाटून घेतील यावर एकमत झाले होते, असा शिवकुमार गटाचा दावा आहे. ऑक्टोबर २०२५ पर्यंत सिद्धरामय्या मुख्यमंत्री राहतील आणि त्यानंतर डीके शिवकुमार यांची पाळी येईल. तर दुसरीकडे सिद्धरामय्या गटाने अशा कोणत्याही कराराचा स्पष्ट इन्कार केला असून तो काल्पनिक असल्याचे म्हटले आहे. अर्थात २०२३ मध्ये सरकार स्थापन झाल्यानंतर शिवकुमार यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण काँग्रेस हसयकमांडने जुने जाणते सिद्धरामय्या यांच्यावर विश्वास दाखवत मुख्यमंत्री केले होते. कर्नाटकात काँग्रेसचे १३५ आमदार असून भाजपाचे ६६ आमदार आहेत.
मुख्यमंत्री बदलासारख्या मुद्द्यांवर पक्षाचे हायकमांड निर्णय घेतात. या संदर्भात समस्या निर्माण करू नयेत, असे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी स्पष्ट केले आहेत. दरम्यान, या प्रतिक्रियेनंतर भाजपने खर्गे यांच्यावर टीका केली आहे. खर्गे पक्षश्रेष्ठी नाहीत, तर मग कोण आहेत? असा प्रश्न विचारला आहे.