
वसंत मोरे हाती बांधणार राष्ट्रवादीचे घड्याळ?
पुण्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट, मनसे नाराज मोरेंना राष्ट्रवादीची आॅफर
पुणे दि ४(प्रतिनिधी)- मनसेचे फायरब्रँड नेते आणि माजी नगरसेवक वसंत मोरे पुन्हा एकदा मनसेत नाराज असल्याच्या चर्चा सुरु झाल्यानंतर त्यांना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ‘तात्या कधी येताय, मी वाट पाहतोय…’असे म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये येण्याची खुली ऑफर दिली आहे. या ऑफरमुळे मोरे यांच्या पक्षांतराच्या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आले आहे. ते यावेळी नक्की हातात घड्याळ बांधणार अशी अटकळ बांधली जात आहे. हा मनसेला मोठा धक्का असू शकतो.
मशिदीवरील भोंग्याचा मुद्दा मनसेने हातात घेतल्यापासून वसंत मोरे पक्षात नाराज असल्याच्या चर्चा आहेत. त्यावेळी त्यांच्याकडुन शहराध्यक्ष पदाची देखील जबाबदारी काढून घेण्यात आली. पण वसंत मोरेंनी स्थानिक मनसे नेते आपली कोंडी करत असल्याचा आरोप वारंवार केला आहे.पक्षाच्या शहर कोअर कमिटीच्या कार्यपद्धतीवर उघड नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या काही दिवसांपासून ते नाराज असल्याच्याही चर्चा शहराच्या राजकीय वर्तुळात सुरु आहेत. पण एका लग्न समारंभात अजित पवारांनी वसंत मोरेंना राष्ट्रवादीत येण्याची खुली आॅफर दिली आहे. अजित पवार यांनी ‘तात्या कधी येताय, मी वाट पाहतोय’ असे म्हणत राष्ट्रवादीत स्वागत असे संकेत दिले आहेत. तर राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनीही आगामी महानगरपालिकेचा विचार करता त्यांनी पक्षात यावे म्हणून गळ घालत असताना मनसे मात्र मोरेंची समजूत काढण्याच्या किंवा त्यांची नाराजी जाणून घेण्याचा कोणताही प्रयत्न करताना दिसत नसल्यामुळे वसंत मोरे लवकरच हाती घड्याळ बांधतील अशी अटकळ बांधली जात आहे.
राज्याचा एवढा मोठा नेता स्वतः त्यांच्या पक्षात येणाचे निमंत्रण देतात, हा अजित पवार यांच्या मनाचा मोठेपणा आणि माझ्या कार्याची पावती आहे, असे मी मानतो असे म्हणत सकारात्मक संकेत दिले आहेत.सध्या मोरेंकडे बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी आहे. पण मोरे राष्ट्रवादीत आल्यास राष्ट्रवादीची ताकत वाढणार असुन मनसेला फटका बसण्याची शक्यता आहे.