रावसाहेब दानवेंकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख
राज्यभरात दानवेंचे पुतळा दहन, मराठा संघटनेचा दानवेंना गर्भित इशारा
मुंबई दि ४(प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यांमुळे राज्यातील राजकीय वातावरण मागील काही दिवसांपासून चांगलच तापलेलं आहे. शिवाजी महाराज यांच्याबद्दल मागील काही दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्य केली जात आहेत.त्यात आता आणखी एका भाजपा नेत्याची भर पडली आहे. रावसाहेब दानवे यांनी शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याने वाद निर्माण झाला आहे.
भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी समर्थ रामदास स्वामी छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू होते, असा दावा त्यांनी केला आहे. तसेच छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख केला आहे. दानवे यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होतं आहे. या व्हिडिओत रावसाहेब दानवे म्हणाले, ”मला असे वाटते की, हे वक्तव्य कोणत्या पार्श्वभूमीवर केले याची एकदा चौकशी व्हावी. हे वक्तव्य वादग्रस्त होऊ शकते की, नाही हे तपासण्याची गरज आहे. मी सुद्धा शिवरायांचा प्रेमी आहे. शिवरायांबद्दल अशा प्रकारचे वक्तव्य कुणी करू नये. शिवरायांचा अवमान करण्यासाठी केलेला हा प्रयत्न आहे का? याचा सर्व समाजाने विचार करायला हवा.(शिवराय ऎवजी दानवे यांनी शिवाजी असा एकेरी उल्लेख केला)रावसाहेब दानवे हे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मंत्री मंगलप्रसाद लोढा यांचा बचाव करत होते. पण आता तेच वादात सापडले आहेत.राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर केलेल्या वक्तव्याचे पडसाद राज्यभरात उमटले. त्यातच केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याने संतप्त झालेल्या शिवभक्तांनी दानवेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत पुतळ्याचे दहन केले आहे.

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे उद्या नाशिक दौऱ्यावर आहेत. परंतु हा उद्याचा दौरा वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. रावसाहेब दानवेंनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याने मराठा क्रांती मोर्चाकडून दानवे यांच्या विरोधात उद्या गनिमीकाव्याने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच राष्ट्रवादीही आक्रमक झाली आहे.