
‘एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी, ठाकरेंकडून युतीचे संकेत
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे वीस वर्षानंतर एकत्र, महाराष्ट्रात बदलाचे राजकारण, महायुतीला धसका?
मुंबई – महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर आज अभूतपूर्व घटना घडली असून तब्बल २० वर्षानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकाच व्यासपीठावर येत मराठीचा आवाज बुलंद केला. दोन्ही ठाकरेंनी एकत्र येत सत्ताधारी महायुती सरकारला थेट आव्हान दिले आहे.
महाराष्ट्र सरकारने त्रिभाषा सूत्र लागू केल्यामुळे दोन्ही ठाकरेंनी एकत्र येत आंदोलनाची हाक दिली होती. त्यामुळे महायुती सरकारने तो निर्णय रद्द केला. महाराष्ट्र सरकारने त्रिभाषा सूत्र मागे घेतल्यानंतर मराठी भाषेच्या लढ्याला मोठं यश मिळालं आहे. या विजयी सभेत उद्धव ठाकरे यांनी यावर भाष्य करताना सत्ताधारी महायुतीवर जोरदार टीका केली आहे. आजच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी एकत्र राहण्यासाठी एकत्र आलो आहोत, अशी घोषणा करत युतीचीच घोषणा केली आहे. ठाकरेंचा विजयी मेळावा वरळीतील डोममध्ये आयोजित करण्यात आला. यावेळी दोन्ही ठाकरेंनी एकत्र आणल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. उद्धव ठाकरे म्हणाले, की राजने भाषणाच्या सुरुवातीला माझा उल्लेख सन्माननीय असा केला. त्याचंही कर्तृत्व आपण सर्वांनी पाहिलं आहे. त्यामुळे माझ्या भाषणाची सुरुवात सन्माननीय राज ठाकरे अशीच करत आहे. राजने त्याच्या भाषणात मराठीचा मुद्दा व हिंदीच्या सक्तीबाबत अप्रतिम मांडणी केली आहे. त्यामुळे माझ्या भाषणाची आवश्यकता वाटत नाही. वैयक्तिक मला वाटतं की आमच्या भाषणापेक्षा आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं आहे. आमच्या दोघांमधील अंतरपाठ अण्णाजीपंतांनी दूर केला आहे. आता तुमच्याकडून अक्षता टाकण्याची अपेक्षा नाही. आम्ही दोघे एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी आलो आहोत, असे सांगत युती झाली असल्याचे संकेत दिले आहेत. काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पुण्यातील एका सभेत ‘जय गुजरात’ अशी घोषणा केली होती. ‘काल एक गद्दार बोलला. जय गुजरात.. किती लाचारी..’ असं म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर टीका केली.
राज ठाकरे यांनीही आज नियोजित केलेला मोर्चा निघायला हवा होता. मराठी माणूस कसा सर्व बाजूने एकवटतो याचं एक चित्र सर्वांनी पाहिलं असतं, मोठ्या प्रमाणात उभं राहिलं असतं. पण नुसत्या मोर्चाच्या चर्चेनेच सरकारला माघार घ्यावी लागली. आजचा हा मेळावा शिवतीर्थावर व्हायला हवा होता. ते मैदान ओसंडून वाहिलं असतं. असे म्हणत मराठी एकजुटीवर भर दिला आहे.