Latest Marathi News
Ganesh J GIF

जिथे ठाकरे, तिथे शिवसेना ; राऊतांचा शिंदे गटाला टोला

बुधवार, 19 जूनला राज्यभरात शिवसेनेचा वर्धापनदिन साजरा करण्यात येणार आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून या वर्धापनदिनाची जोरजार तयारी करण्यात आली आहे. शिवसेना शिंदे गटाने वर्धापनदिनानिमित्त बॅनरबाजी करत ठाकरे गटाला डिवचण्याचे काम केले आहे.पण त्यांच्या या डिवचण्याला आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. हिंदुहृदयस्रमाटांच्या विचारधारेशी बेईमानी करत महाराष्ट्राचे दुश्मनांशी हातमिळवणी करणारे शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा करू शकत नाही. जिथे ठाकरे तिथे शिवसेना, असे म्हणत राऊतांनी शिंदे गटावर टीकास्त्र डागले आहे.

प्रसार माध्यमांसमोर खासदार संजय राऊत म्हणाले की, उद्या शिवसेनेचा 58 वा वर्धापन दिन आहे. हिंदुहृदयस्रमाट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या रक्षणासाठी, मराठी माणसासाठी शिवसेनेची स्थापना केली. आता उद्धव ठाकरे त्या शिवसेनेचे नेतृत्व करत आहे. शिंदे यांचा शिवसेनेशी काय संबंध? हिंदुहृदयस्रमाटांच्या विचारधारेशी बेईमानी करत महाराष्ट्राच्या दुश्मनांशी हातमिळवणी करणारे शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा करू शकत नाही. जिथे ठाकरे तिथे शिवसेना. आमचा उद्या मोठा कार्यक्रम आहे. संपूर्ण देशातून लोकं येणार आहे. येत्या विधानसभा निवडणूकीत काय रणनीती असणार त्याविषयी उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत, असे यावेळी राऊतांकडून सांगण्यात आले आहे.

तर, बाळासाहेबांच्या विचारधारेची शिवेसना उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात जोमाने पुढे जात आहे. आमची शिवसेना खरी म्हणणाऱ्यांनी आरशात पहावे, शिवसेना स्थापन झाली तेव्हा ते कुठे होते. कुठल्या गोधडीत रांगत होते. पण वर्धापनदिनी डोम नावाच्या सभागृहात हे सर्व डोमकावळे जमणार आहेत. पैशाने मते विकत घेणे, वायकरांसारख्या विजयाच्या चोऱ्या करणे याला जनाधार म्हणत नाही, असे म्हणत त्यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला. जनतेने शिवसेनेला जनाधार दिला आहे, या वायकरांच्या विधानावर राऊतांनी प्रत्युत्तर दिले आहे.आपला गट महाराष्ट्राशी दुश्मनी करणाऱ्या मोदी शहांच्या चरणावर ठेवणे याला जनाधार म्हणत नाही. लांडग्यांनी वाघाचे कातडे पांघरले तर ते वाघ होत नाहीत. जिथे ठाकरे तिथे शिवसेना. हे मधे शिंदे मिंधे जे आले आहेत त्यांना भाजपाने आणले आहे. हे महाराष्ट्राविरोधातले कारस्थान आहे. शिवसेना फोडणे हे मोगलांनंतरचे महाराष्ट्रावरचे सगळ्यात मोठे आक्रमण होते, हे आक्रमण मोदी शहांनी केले आहे, असा जहरी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!