एक मन हेलावून टाकणारी घटना (Missing Children) उघडकीस आली आहे. यामध्ये पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टेका नाका परिसरातून सहा वर्षे वयोगटातील तीन चिमुरड्यांचाकारमध्ये गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
काय घडले नेमके ?
शनिवारी सायंकाळी 6 वर्षे वयोगटातील तीनही मुले टेका नाकाजवळील फारुख मैदानावर खेळत होते. रात्र झाली तरी घरी न परतल्याने त्यांच्या पालकांनी पोलिसांत धाव घेतली. यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आजूबाजूच्या परिसरात या मुलांचा शोध घेतला. तसेच त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेज तपासले मात्र त्या मुलांचा कुठेच पत्ता लागला नाही.यानंतर अधिक तपास केला असता “या मुलांचे मृतदेह फारुख नगर येथील मैदानात पार्क केलेल्या एका जुन्या कारमध्ये सापडले. ही मुलं त्या कारमध्ये खेळत होती. खेळता खेळता अचानक कार लॉक झाल्याने या मुलांना बाहेर पडता नाही आले. यामुळे या मुलांचा दुर्दैवाने गुदमरून आणि उष्णतेमुळे मृत्यू झाला”, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. मृत झालेल्या मुलांमध्ये दोन भावंडे आणि त्यांची एक मैत्रीण यांचा समावेश आहे. एकाचवेळी परिसरातील तीन लहान मुलांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.