मुंबई दि २७(प्रतिनिधी) – शिवसेनेतील अभूतपूर्व फुटीनंतर शिंदे गटाने ठाकरेंना शक्य तेथे आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे यंदाच्या दसरा मेळाव्यावरुनही राजकारण रंगले आहे. शिवसेना आणि दसरा मेळावा असे एक अतूट नाते असून, या निमित्ताने दादरच्या शिवाजी पार्क मैदानात होणाऱ्या शिवसेनेच्या सभेला राज्यातील कानाकोपऱ्यातून शिवसैनिक उपस्थिती लावतात. मात्र, यंदा पाच ऑक्टोबरला येणाऱ्या दसऱ्याच्या निमित्ताने शिवाजी पार्क मैदानात नेमका कोणी मेळावा घ्यायचा, यावरून उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. शिवतीर्थावर शिंदे गटाचा मेळावा व्हावा यासाठी भाजपाने प्रयत्न सुरु केले आहेत.
मुंबई महापालिकेकडून मेळाव्याला परवानगी मिळावी यासाठी शिवसेनेने २२ आॅगस्टला अर्ज दाखल केला असताना, महापालिकेने अद्याप त्यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यांच्यावर फडणवीसांचा दबाव असल्याची चर्चा आहे. शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर खरी शिवसेना कोणाची यात आपले स्थान अधिक बळकट करण्यासाठी यंदाचा दसरा मेळावा महत्त्वाचा आहे. यावेळी शिवसेनेने खबरदारीचा उपाय म्हणून मेळाव्याच्या परवानगीसाठी अर्ज केला आहे. मात्र त्यांना परवानगी देण्यासाठी महापालिकेनेच हात आखडता घेतला आहे. उद्धव ठाकरे यांनी महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांच्याशी स्वतः संवाद साधला आहे. पण त्यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.दसरा मेळाव्याची परवानगी शिवसेनेऐवजी शिंदे गटाला मिळावी यासाठी पडद्यामागून जोरदार हालचाली सुरू आहेत. यासाठी शिंदे गटाला भाजपाची साथ मिळत आहे. शिवसेनेला परवानगी नाकारली गेल्यानंतर एकनाथ शिंदे गट मेळाव्याला परवानगी मागणार आहे.त्यामुळे मैदान कोणाला मिळणार हे अजून गुलदस्त्यात आहे.
शिंदे गटाला परवानगी मिळाली तर एकनाथ शिंदेसह देवेंद्र फडणवीस मार्गदर्शन करणार आहेत. याकडे शिवसैनिक कोणत्या नजरेने पाहणार हे देखील महत्वाचे आहे. त्यामुळे शिवसेना कोणाची यावरून सुरु झालेला वाद आता मैदान कोणाचे इथपर्यंत येऊन पोहोचला आहे.