Latest Marathi News
Ganesh J GIF

ठाकरेंशी गद्दारी का केली? खासदार मानेंना शिवसैनिकांचा सवाल

धैर्यशील मानेंची गाडी रोखत शिवसैनिकांनी विचारला जाब, व्हिडिओ व्हायरल

कोल्हापूर दि ८(प्रतिनिधी)- शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांना आज शिवसैनिकांच्या रोषाचा सामना करावा लागला. ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी त्यांचा ताफा अडवत गद्दारी का केली असा जाब विचारला. यावेळी ठाकरे गटाचे शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले होते. अखेर पोलीसांनी शिवसैनिकांना बाजूला काढल्यानंतर माने पुढे मार्गस्थ झाले.

धैर्यशील माने हे आज सकाळी हातकणंगले तालुक्यातील चंदूर येथे एका कार्यक्रमासाठी जात होते. त्यावेळी ठाकरेंच्या शिवसैनिकांनी अचानक माने यांचा ताफा अडवला.माने यांना गद्दारी का केली असा सवाल विचारत जोरदार त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. ते पाहुन शिंदे गटाचे कार्यकर्ते देखील समोर आले आणि दोघांमध्ये वादा वादी सुरु झाली. मात्र, तातडीने पोलिसांनी घटनास्थळी येऊन कार्यकर्त्यांना बाजूला करत शांत केले आणि धैर्यशील माने यांचे गाडी पुढे मार्गस्थ केली. यावेळी बोलताना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव म्हणाले की, “शिवसैनिकांशी आणि ज्यांनी त्यांना निवडणुकीचे तिकीट दिले त्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी करत धैर्यशील माने शिंदे गटात गेले. यामुळे शिवसैनिक प्रचंड आक्रमक झाले असून प्रत्येक गावामध्ये त्यांना आडवत जाब विचारण्यासाठी ते आता सज्ज झाले आहेत आणि संपूर्ण जिल्ह्यात अशा पद्धतीनेच सर्व गद्दारांना जाब विचारण्यात येईल” असा इशारा दिला आहे.

 

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर खासदार माने यांनी देखील शिंदे यांना साथ दिली. त्यामुळे ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी माने यांच्या घरावर मोर्चा काढत जाब विचारला होता. काही दिवसापुर्वी संजय राऊत कोल्हापूर दाै-यावर आले होते तेंव्हा त्यांनी सुद्धा मानेंवर जोरदार टिका केली होती. आणि आज पुन्हा मानेंना शिवसैनिकांच्या रोषाचा सामना करावा लागला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!