
भाजपा एकनाथ शिंदेला महायुतीतून धक्का देणार?
महायुतीत धुसफूस, शिंदेपेक्षा भाजपाला अजित पवार जवळचे?, एकनाथ शिंदे गटात अस्वस्थता
मुंबई – महायुती सरकार प्रचंड बहुमतात आलं असूनही, सत्ता वाटप आणि निर्णय प्रक्रियेवरून अंतर्गत मतभेदाचे संकेत दिसू लागले आहेत. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संघर्ष निर्माण झाला आहे. त्यावरून एकनाथ शिंदे नाराज झाले आहेत.
स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमावरून उफाळलेल्या या वादात, सरकारने परिपत्रक काढून अदिती तटकरे यांना रायगडमध्ये ध्वजारोहणाचा अधिकार दिला आहे. त्यामुळे शिंदे गट नाराज आहे. रायगड जिल्ह्यात पालकमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती होणार, यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जुंपली आहे. भरत गोगावले हे या पदासाठी आग्रही आहेत, तर राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांनीही यावर दावा सांगितला आहे. या वादामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री पदाच्या नियुक्तीला तात्पुरती स्थगिती दिली आहे. पण महाराष्ट्र दिनापाठोपाठ स्वातंत्र्यदिनी रायगडमध्ये ध्वजारोहणासाठी आदिती तटकरे यांनाच संधी देण्यात आली. यावरून पालकमंत्रीपद तटकरे यांच्याकडेच कायम राहणार, असा अर्थ काढला जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोंडी करण्याचे पद्दतशीरपणे प्रयत्न सरकारमधून सुरू असतात. ठाण्यातील बोगद्याच्या कामाची निविदा रद्द करण्याची भूमिका सरकारने सर्वोच्च न्यायालयात घेतली. त्याचबरोबर अलिकडच्या काळात शिंदे गटातील मंत्र्यांचे नवनवीन प्रताप समोर आले आहेत. आगामी स्वातंत्र्य दिन सोहळ्यासाठी ध्वजारोहण करणाऱ्या मंत्र्यांची यादी नुकतीच जाहीर झाली आहे. पण या यादीतून शिंदे गटातील काही मंत्र्यांना वगळण्यात आल्याने असंतोष वाढल्याचे सांगितले जात आहे.
आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी भाजपने कंबर कसली आहे. भाजपचे जोरदार इनकमिंग सुरू आहे. त्यात भाजपने सहकारी शिवसेना एकनाथ शिंदे गटाला मागे सोडले आहे. भाजपची स्वबळावर निवडणुकीची तयारी सुरू आहे. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवता येईल का? असा प्रश्न शिंदे गटाला पडला आहे.