
युती केलेल्या शिंदे गटाला भाजपा कात्रजचा घाट दाखवणार?
'या' घोषणेतून अमित शाहांचा ठाकरेंबरोबर शिंदे गटालाही इशारा
मुंबई दि ५ (प्रतिनिधी)- “मुंबईतल्या राजकारणावर फक्त भाजपाचे वर्चस्व असावे. मुंबई महापालिकेत पुढचा महापौर भाजपाचा होणार”, असे वक्तव्य करून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकांचे रणशिंग फुंकले. मात्र, अमित शाहांच्या या वक्तव्यामुळे भाजपासोबत युती केलेल्या शिंदे गटाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेत शिंदे गटाचे वर्चस्व टिकणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.आगामी काळात जागा वाटप करताना आणि सत्तेच्या वाटपावरुन भाजपा शिंदे गटाला किती महत्व देणार हे पहावे लागणार आहे.
अमित शाह यांच्या उपस्थितीत मुंबईत भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक पार पाडली. या बैठकीत अमित शाह यांनी संबोधित करताना ‘मिशन १५०’ असे म्हणत महापालिका निवडणुकीच्या तयारीचा संकल्प केला. यावेळी अमित शाह यांनी “मुंबई महापालिकेत पुढचा महापौर भाजपाचा होईल. प्रत्येक कार्यकर्ता रस्त्यावर आला पाहिजे. मुंबईतल्या राजकारणावर वर्चस्व फक्त आणि फक्त भाजपाचे असावे”, असे वक्यव्य केले. त्यामुळे यातून भाजपा शिंदे गटाला गृहित धरणार नसल्याचे संकेत दिले आहेत. ढगांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टिका केली. ती केली जाणार हे गृहीतच होते. पण फक्त भाजपा या वाक्यामुळे शिवसेनेतून बंडखोरी करून भाजपाशी युती करत राज्याच सरकार स्थापन केलेल्या शिंदे गटाला भाजपा योग्य वागणूक देणार का, असा सवाल उपस्थित होत आहे. कारण सध्या महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस यांचे सरकार आहे, मात्र अमित शाहांनी केलेल्या वक्तव्यावरून महापालिका निवडणुकीत भाजपा शिंदे गटाला धक्का देण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे.
मध्यंतरी देखील केंद्रीय मंत्र्यांनी शिंदे गटातील खासदार आणि आमदार असलेल्या मतदारसंघात जात भाजपाचा उमेदवार निवडून आणा असा संदेश दिला अगदी एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्याही मतदारसंघात भाजपाने शक्तीप्रदर्शन केले. त्याचबरोबर भाजपाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी आगामी लोकसभेत मिशन ४५ चे लक्ष्य ठेवले आहे. मग ते लोकसभेत शिंदे गटाला जागा देणार की नाही हा मुद्दा उपस्थित होतो. आणि आता मिशन १५० चा नारा देताना शिंदे गटाला किती महत्व देणार याबद्दल देखील शंका व्यक्त केली जात आहे. कारण एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री केल्यानंतर दुस-या भेटीवेळी त्यांना तब्ब्ल १२ ते १३ तास वाट पहावी लागली होती. तसेच शत प्रतिशत भाजपा हा नारा भाजपाचा आजही कायम आहे.त्यामुळे शिंदेचे महत्व संपल्यात जमा आहे की शिंदेनी भाजपात सामील व्हावे याचा उलगडा पुढील काळात स्पष्ट होणार आहे.
पुढील चार महिन्यात मुंबई महापालिकांचे बिगुल वाजणार असून, शिवसेना-भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. पण ही निवडणूक भाजप युतीत लढणार की स्वबळावर हे अजून स्पष्ट नाही. पण अमित शाहांच्या या वक्तव्यामुळे शिंदे गटाचे महत्व भाजपासाठी किती आहे. हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.यासाठी निवडणुकीचे बिगुल वाजण्याची वाट पहावी लागणार आहे.