लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला राज्यात घवघवीत यश मिळालं तर महायुतीला चांगलाच चांगलाच फटका बसला आहे. आता लोकसभा निवडणुकीनंतर सर्व पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीत सुद्धा राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट सामना पाहायला मिळेल. लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीच्या चर्चेच्या केंद्रस्थानी राहतील ते म्हणजे “शरद पवार”.
राष्ट्रवादीतील फुटीनंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक असणार आहे. त्यामुळे शरद पवार नेमका काय डाव टाकणार? राज्यात आपल्या पक्षाला पुन्हा एकदा नवी उभारी देणार का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष्य लागलं आहे. कोणत्याही क्षणी डाव उलटवण्याची ताकद, जनसंपर्क आणि क्षमता शरद पवारांकडे असल्याने आजही केंद्रातील आणि राज्यातील भलेभले नेते पवारांना दचकून असतात. आताही शरद पवार यांच्याकडे म्हणावे तसे ताकदवान नेते नाहीत. पण शरद पवार हे तरुणांना संधी देऊन नवीन चेहरे राजकारणात आणू शकतात. त्या दृष्टीने त्यांनी पाउले टाकायला सुरुवात केल्याचं दिसून येतंय.
अजित पवारांच्या बंडानंतर जमतेम १२-१३ आमदार शरद पवारांसोबत आहेत. थोरल्या पवारांचा पक्ष आणि चिन्ह सुद्धा निवडणूक आयोगाने काढून ते अजित पवार यांना दिल आहे. मात्र तरीही लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीत सुद्धा पवारांची तुतारी दणक्यात वाजेल अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. पवार पुन्हा आपली पॉवर दाखवू शकतील का? त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष विधानसभेत पुन्हा एकदा मुसंडी मारू शकतो का ? जाणून घेऊया…राष्ट्रवादी काँग्रेस स्थापनेपासून जास्तीत जास्त काळ सत्तेत राहिला आहे. शाहू- फुले- आंबेडकरांचा विचार जपणारा आणि शेतकरी, कष्टकऱ्यांच्या पाठीशी उभा राहणारा, ग्रामीण महाराष्ट्राचा पक्ष म्हणून राष्ट्रवादीची ओळख आहे… आत्तापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी महाराष्ट्रात महत्वाची खाती सांभाळली आणि महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील जनतेशी चांगलीच नाळ जुळवली हा इतिहास आहे. १९९९ ला पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला ५८ जागांवर यश मिळालं. त्यानंतर २००४ च्या विधानसभा निवडणुकीत ७१ जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादी उदयास आला.२००९ च्या विधानसभेला पुन्हा ६२ आमदार राष्ट्रवादीने निवडून आणले. या तिन्ही निवडणुकांनंतर पक्षाने राज्यातील सत्ता आपल्या हातात ठेवली. मात्र २०१४ ला भाजप- शिवसेनेचे सरकार आलं त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसला 41आमदाराना निवडून आणता आले. २०१९ ला तर पक्षातील अनके बड्या नेत्यांनी साथ सोडूनही फक्त शरद पवारांच्या करिष्म्यावर पक्षाने ५४ आमदार निवडून आणले आणि महाविकास आघाडीचा प्रयोग करून सत्ताही स्थापन केली.
दरम्यान अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडली आणि शरद पवारांकडे फक्त १२ आमदार राहिले. शरद पवार आणि त्यांचा पक्ष संपला असं मत अनेक राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलं. मात्र हार मानतील ते पवार कसले. पक्ष आणि चिन्ह गेलं, निवडणूक आयोगाने तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह शरद पवारांना दिलं. तीच तुतारी पवारांनी लोकसभा निवडणुकीत फुंकली आणि त्यांच्या पक्षाने १० पैकी ८ खासदार निवडून आणून घवघवीत यश मिळवलं.आता आगामी विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या पक्षाला सत्तेत बसण्याची मोठी संधी आहे… शरद पवारांकडे स्वतःची पॉवर आहे, एकनिष्ठ नेत्यांची फळी आहे, युवा नेत्यांची साथ आहे आणि महत्वाची बाब म्हणजे बेरजेचे राजकारण करण्याची ताकद आहे. त्यामुळेच शरद पवार गटाला पुन्हा एकदा उभारी घेण्याची संधी असणार आहे.शरद पवार हे आज राज्याचे दौरे करताना आपल्या दिसून येतात. एखाद्या तरुण नेत्याच्या ईर्ष्येने शरद पवार हे मैदानात उतरलेले दिसतात. त्यांची हीच जिगर हा तरुणांच्या देखील कौतुकाचा विषय आहे. ते लोकांमध्ये जाऊन मिसळतात. त्याच्याशी चर्चा करुन त्यांच्या अडचणी समजून घेतात. शरद पवारांना राज्याच्या प्रत्येक भागातील इत्थंभूत माहिती आहे. ५० वर्षाचा राजकीय अनुभव आहे. जिल्हा-जिल्हातील जातीपातीचं राजकारण माहिती आहे. प्रचंड मोठा जनसंपर्क आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूकीत शरद पवार गटाला याचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.
पक्षफुटीनंतर छगन भूजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे याच्यासह अनेक नेते अजित पवार यांच्या सोबत गेले मात्र निष्ठावान म्हणून जयंत पाटील, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे यांच्यासारखे दिग्गज नेते शरद पवार यांच्या सोबतीला आहेत. शरद पवार आणि पक्षासाठी काहीही करण्याची धमक या आमदारांमध्ये आहे. हे नेते सध्याच्या राजकीय परिस्थितीत इतर कोणत्याही पक्षात प्रवेश करण्याची अजिबात शक्यता नाही. याशिवाय रोहित पवार, रोहित पाटील, युगेन्द्र पवार यांच्यासारखे युवा नेते तसेच पुढच्या पिढीतील नवीन चेह-यांना संधी देऊन शरद पवार राजकारणात आणू शकतात.पक्ष फुटीनंतर शरद पवार यांच्या बद्दल लोकांच्या मनात सहानुभूती आहे. लोकसभा निवडणूकीत १० पैकी ८ जागा जिंकत लोकांनी शरद पवार यांच्याबद्दल सहानुभूती दाखवून दिली. वय वर्ष ८४ वर्षाचा असताना ही हा योद्धा अजूनही लोकांच्यात जातोय, त्यांचे प्रश्न समजावून घेतोय, ऊन-वारा-पाऊस कशाचीही तमा न बाळगता या वयात संघर्ष करतोय, यामुळेच महाराष्ट्रातील जनतेच्या मनात शरद पवार यांच्याविषयीचे प्रेम दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे.महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न असो, कष्टकर्यांचे प्रश्न असो, कामगारांचे प्रश्न असो किंवा विद्यार्थ्यांचा प्रश्न असो… शरद पवार प्रत्येक प्रश्न अतिशय हुशारीने हाताळतात. पवार सत्तेत असो वा विरोधात असो, अनेकवेळा सरकारला सुद्धा पवारांशी चर्चा करूनच अनेक विषयांवर तोडगा काढावा लागतो. त्यामुळे आबालवृद्धांमध्ये शरद पवार यांच्याबद्दल कुतूहल मिश्रित आदर आहे.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे सरकारशी लढत आहेत. सरकार विरोधात मराठा समाजात मोठी नाराजी आहे. त्याचाच फायदा लोकसभा निवडणूकीत महाविकास आघाडीला झाला. भाजपाच्या अनेक दिग्गज नेत्यांचा या निवडणुकीत पराभव झाला. राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. मनोज जरांगे यांच्या यांच्या मागण्या मान्य करण्यात सरकारला अजून यश मिळालं नाही. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूकीत जरांगे फॅक्टरचा फायदा शरद पवारांना मिळू शकतो.लोकसभा निवडणुकीत शेतकरी वर्गाच्या नाराजीचा भाजपला मोठा फटका बसला. कापूस, सोयाबीन, कांदा उत्पादक शेतकरी सरकारवर चांगलेच नाराज होते. केंद्राची शेतीविषयक धोरणे शेतकऱ्यांच्या बाजूची नाहीत, असा समज पक्का झाला आहे. शरद पवार हे शेतकरी वर्गात लोकप्रिय आहेत. कोणत्याही दौर्यात ते आधी बांधावर जातात. सहकार, साखर, दुध, पीकपाणी बाजार समित्या आदींची पवारांना चांगलीच जाण आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाला आपल्या बाजूने वळवून शरद पवार मोठा चमत्कार करू शकतात.