
ठाकरे गटाच्या खासदार दादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार?
खासदारकी राखण्यासाठी ठाकरेंची साथ सोडत दादांना साथ देणार? नरेंद्र मोदींचे काैतुक करत दिले संकेत?
मुंबई – विधानसभा निवडणूकीतील पराभवानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या अडचणी वाढल्या आहेत.
प्रियंका चतुर्वेदी यांचा राज्यसभेतील कार्यकाळ पुढील ११ महिन्यांत संपत आहे. त्यामुळे पुन्हा निवडून येण्याच्या शक्यता कमी असल्याने त्यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. त्यातच त्यांनी नुकतीच पार्थ पवार आणि प्रफुल्ल पटेल यांची भेट घेतली होती, यात राज्यसभेची उमेदवारी मिळणार या अटीवर त्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता आहे. मागील आठवड्यातच प्रियंका यांनी एका पॉडकास्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले होते, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना निरोप देण्यासाठी हे सर्व नियोजित प्रयत्न होते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. खासदार म्हणून राहतील, या अटीवर त्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. प्रियंका चतुर्वेदी अजित पवारांसोबत गेल्यास हा ठाकरेंना मोठा धक्का मानला जाईल.
प्रियंका चतुर्वेदी यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी म्हटलंय की, एक तृतीय श्रेणीचा पत्रकार कॉर्पोरेट क्लायंटसाठी अजेंडा वापरतोय. तो माझ्याबद्दल खोटे पसरवू लागला आहे. या दयनीय व्यक्तीने आधीही प्रयत्न केले होते, आता त्याने पुन्हा त्याच्या इशाऱ्यावर काम सुरू केले आहे, असा आरोप करत पक्ष प्रवेशाची चर्चा फेटाळून लावली आहे.