खासदार बाळू धानोरकर यांच्या निधनाने कर्तृत्वान तरुण नेतृत्व हरपले
बाळासाहेब थोरात यांच्याकडून धानोकरांच्या आठवणींना उजाळा, जनतेचा नेता गमावल्याची भावना
मुंबई दि ३०(प्रतिनिधी)- खासदार बाळू धानोरकर यांच्या आकस्मिक निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक आणि वेदनादायी आहे. अत्यंत सामान्य कुटुंबातून येऊन मेहनत आणि लोकसेवेच्या बळावर नावारूपास आलेले तरुण कर्तृत्वान नेतृत्व हरपले आहे अशा शोकभावना काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केल्या आहेत.
खा. धानोरकर यांच्या जाण्याने सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी तळमळीने झटणारा कार्यकर्ता आपल्यातून निघून गेलेला आहे, अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेल्या धानोरकर यांनी लोकसेवा करत राजकीय जीवनाची सुरुवात केली आणि एक एक पायरी चढत आमदार आणि खासदार झाले. सदैव उपलब्ध असणारे आणि लोकांच्या मदतीला धावून जात असल्याने अल्पावधीतच ते चंद्रपूर जिल्ह्यात लोकप्रिय झाले. चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाचे विषय ते अत्यंत पोटतिडकीने मांडत असतं. प्रसंगी गोडीने, कधी आक्रमक होऊन प्रश्न सोडवून घेणारे अशा प्रकारचे त्यांचे व्यक्तिमत्व होते. खासदार म्हणून पुन्हा निवडून येण्याची त्यांची क्षमता होती. विधानसभा निवडणुकीमध्येही काँग्रेस पक्षाला ताकद देण्याचे काम व जास्तीत जास्त सदस्य निवडून आणण्याकरता विदर्भामध्ये त्यांची आम्हाला मदत होणार होती. पण त्यांच्या अचानक निधनाने काँग्रेस पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे.
खासदार बाळू धानोरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून धानोरकर कुटुंबाला या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो, आम्ही सर्वजण त्यांच्या दुःखात सहभागी आहोत असे थोरात म्हणाले.