
आता राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार दरवर्षी १२ हजार रुपये
शिंदे फडणवीस सरकारची शेतकऱ्यांना गुड न्यूज, महत्वाच्या दोन योजनांना मंजुरी
मुंबई दि ३०(प्रतिनिधी)- राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. या बैठकीत शेतकरी कुटुंबाला ६ हजारांचं अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यात देखील नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना लागू करण्यात आली आहे. बैठकीत शेतकऱ्यांसाठी दोन योजनांना मंजुरी देण्यात आली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्यात शेतकरी महा सन्मान निधी योजना सुरू करणार असल्याची घोषणा केली होती. केंद्र सरकार पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकरी कुटुंबाला दरवर्षी ६ हजार रुपयांचा निधी देते. त्याच धर्तीवर राज्य सरकारही ६ हजार रुपये निधी देणार आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळून एकूण १२ हजारांचा निधी शेतकऱ्यांना मिळणार आहे. नमो शेतकरी महासन्मान योजनेचा राज्यातील एक कोटी १५ लाख शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्याचबरोबर मंत्रिमंडळाच्या बैटकीत राज्यातील शेतकऱ्यांना १ रुपयांत पिक विमा देण्याच्या प्रस्तावाला देखील मंजुरी मिळाली आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आता केवळ १ रुपयांत पिक विमा मिळणार आहे. याची उर्वरित रक्कमेचा हप्ता आता राज्य सरकार भरणार असल्याची घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.
दरम्यान या बैठकीमध्ये इतर अनेक विभागासाठी देखील निर्णय घेण्यात आले आहेत. राज्याला माहिती तंत्रज्ञानात देशात आघाडीवर नेणाऱ्या नवीन माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरणास मान्यता देण्यात आली. तसेच कामगारांची सुरक्षा, आरोग्य, कामाच्या स्थितीबाबत नवीन कामगार नियमांना मान्यता देण्यात आली आहे. महिलांना पर्यटन व्यवसायात अधिक वाव देण्यासाठी महिला केंद्रीत पर्यटन धोरण राबविण्यात येणार आहे.