
जागतिक स्तरावर सुरू असलेली युद्धे आणि विस्कळीत झालेली विस्कळीत ऊर्जा साखळी या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना एक अत्यंत महत्त्वाचा सल्ला दिला आहे. “इंधन वाचवा आणि शक्य असेल तिथे ‘वर्क फ्रॉम होम’ मॉडेलचा पुन्हा वापर करा,” असे आवाहन मोदींनी केले आहे.

पंतप्रधानांच्या मते, इंधन बचत हा आता केवळ पर्यावरणाचा विषय नसून तो देशाच्या आर्थिक मजबुतीशी जोडला गेला आहे.लोक ऑफिसला जाण्याऐवजी घरून काम करतील, तेव्हा पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी होईल. यामुळे भारताच्या तेल आयातीचा खर्च घटण्यास मदत होईल.इंधनावरील खर्च कमी झाल्यामुळे देशाच्या परकीय चलन साठ्यावर येणारा दबाव कमी होईल आणि रुपया अधिक मजबूत होईल.कोरोना काळात आपण ऑनलाइन मीटिंग्स आणि व्हिडिओ कॉन्फरन्सची सवय करून घेतली होती, तीच शिस्त आता पुन्हा गरजेची असल्याचे मोदींनी नमूद केले.

पंतप्रधानांनी केवळ इंधनावरच नव्हे, तर सोन्याच्या खरेदीवरही भाष्य केले आहे. मध्यपूर्वेतील युद्ध आणि युक्रेन युद्धाचे परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होत आहेत. हे पाहता, “येत्या एक वर्षापर्यंत लग्नासाठी किंवा गुंतवणुकीसाठी सोने खरेदी करणे टाळा,” असे आवाहन त्यांनी जनतेला केले आहे. सोन्याच्या आयातीमुळेही देशाबाहेर जाणारा पैसा वाचवणे हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे.

पंतप्रधानांच्या या सूचनेमुळे खासगी क्षेत्रात पुन्हा एकदा हायब्रिड वर्क कल्चरची चर्चा सुरू झाली आहे. याचे काही मुख्य फायदे:
रस्त्यांवरील वाहने कमी झाल्यामुळे ट्रॅफिक जामची समस्या सुटेल आणि शहरांमधील प्रदूषणाची पातळी घटेल.
कप्रवासात जाणारा वेळ आणि पैसा वाचल्यामुळे कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढू शकते.
ऑफिसची वीज, जागा आणि इतर देखभालीचा खर्च कमी होण्यास मदत होईल.
तज्ज्ञांच्या मते, जर केंद्र सरकारने या संदर्भात अधिकृत ‘ग्रीन वर्क पॉलिसी’ आणली आणि कंपन्यांना घरून काम देण्यासाठी प्रोत्साहन दिले, तर भारत आपल्या तेल आयातीवरील अवलंबित्व लक्षणीयरीत्या कमी करू शकतो.

