
महिलांचे लैंगिक शोषण, कोट्यवधींचा आर्थिक घोटाळा आणि जमीन बळकावल्याप्रकरणी अटकेत असलेला नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. दरम्यान, या प्रकरणात गेल्या मार्च महिन्यापासून फरार असलेली त्याची पत्नी कल्पना खरात अखेर पोलिसांसमोर हजर झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केल्यानंतर तिने शिर्डी पोलीस ठाण्यात जाऊन आपला जबाब नोंदवला आहे.

चेहऱ्यावर भीती ना ताणतणाव! हसत-खेळत नोंदवला जबाब

अनेक महिन्यांपासून शिर्डी पोलीस कल्पना खरात हिचा शोध घेत होते, मात्र ती पोलिसांना चकवा देत होती. सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळताच ती शिर्डी पोलीस ठाण्यात हजर झाली. विशेष म्हणजे, पोलिसांसमोर जबाब नोंदवून कारच्या दिशेने जाताना तिच्या चेहऱ्यावर कोणताही ताणतणाव किंवा भीती दिसत नव्हती. एखाद्या नियमित शासकीय कामासाठी आल्याप्रमाणे अत्यंत शांतपणे जबाब नोंदवून ती लागलीच शिर्डीतून निघून गेली.

“जमीन व्यवहारात माझा काहीच संबंध नाही” – कल्पना खरातचा दावा
शिर्डीतील एका शेतकऱ्याची जमीन व्यवहारात फसवणूक केल्याप्रकरणी अशोक खरातसोबत कल्पना खरात हिच्यावरही गुन्हा दाखल आहे. पोलिसांना दिलेल्या जबाबात तिने सर्व खापर पतीवर फोडले आहे. शिर्डीतील जमीन व्यवहाराबाबत मला कोणतीही माहिती नाही. माझ्या अपरोक्ष हे सर्व व्यवहार झाले आहेत. पती अशोक खरात यानेच परस्पर हे सर्व व्यवहार केले,” असा दावा कल्पना खरात हिने पोलिसांसमोर केला आहे.
भोंदूबाबा खरातवर SIT आणि ED ची नजर
धार्मिक विधी, भोंदूबाबागिरी आणि दैवीशक्तीच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण करणे, तसेच कोट्यवधींची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी अशोक खरात सध्या तुरुंगात आहे. त्याच्याविरोधात विशेष तपास पथक (SIT) आणि अंमलबजावणी संचालनालय (ED) कडून गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले असून सध्या या प्रकरणांचा सखोल तपास सुरू आहे. आता पत्नीच्या जबाबानंतर या तपासाला कोणती नवी दिशा मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

