
‘हवेली तालुक्याची अस्मिता असणारा यशवंत साखर कारखाना सुरु करणार’
राहुल शेवाळे यांच्या निवेदनानंतर देवेंद्र फडणवीसांचे ठोस आश्वासन
पुणे दि ४ (प्रतिनिधी) – हवेली तालुक्यातील थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखाना सुरु व्हावा यासाठी लवकरच मुंबईत बैठक घेऊन कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. त्यामुळे यशवंत कारखाना सुरू होण्याची आस निर्माण झाली आहे.गेली दहा वर्षाहून अधिक काळ कारखाना बंद अवस्थेत आहे.
भाजपाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष राहुल शेवाळे यांनी यशवंत कारखाना सुरु करण्याचे निवेदन फडणवीसांना दिले आहे. यावेळी कारखाना सुरु करण्याची हमी फडणवीसांनी दिली आहे. यशवंत साखर कारखान्याचे भुमीपुजन महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले होते. त्यामुळे या कारखान्याचे नाव त्यांच्या सन्मानार्थ ठेवण्यात आले होते. हा कारखाना हवेली आणि शिरूर तालुक्यातील शेतक-यांसाठी वरदान ठरला. जवळपास २० हजार शेतकरी या कारखान्याचे सभासद आहेत. पण तत्कालीन चुकीच्या धोरणामुळे कारखाना कर्जबाजारी झाल्याने अखेर कारखाना बंद पडला गेली दहा अकरा वर्ष कारखान्याचे धुराडे पेटलेले नाही. त्यामुळे या कारखान्याचे सभासद शेतकरी, कामगार यांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांनी देखील कारखाना सुरु करण्यासाठी प्रयत्न केले पण अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. हा कारखाना सुरु केल्यास शेतकऱ्यांनाही फायदा होईल. त्यामुळे कारखाना सुरू करण्याची मागणी राहुल शेवाळे यांनी देवेंद्र फडणवीसांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यशवंत कारखान्यावर या भागातील राजकीय समीकरणेही अवलंबून आहेत. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात भाजपाला आपली मुळे घट्ट वाचायची असल्यामुळे यशवंत साखर कारखाना सुरु करुन फायद्याची समीकरणे तयार होतील त्यामुळे यशवंत कारखाना सुरु करण्याचे आश्वासन सत्यात कधी उतरणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.