‘तुम्ही मोदी आमचा बाप म्हणता, तेंव्हा चालते का?’
संजय राऊतांच्या सवालाने शिंदे गट क्लीन बोल्ड, खासदारकीबद्दल केले मोठे वक्तव्य
मुंबई दि २१(प्रतिनिधी)- राज्यात एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर संजय राऊत विरूद्ध शिंदे गट यांच्यात जोरदार घमासान पहायला मिळत आहे. पण आज संजय राऊत यांनी दादा भुसेंवर आरोप केल्यानंतर थेट विधानसभेत गद्दार विरुद्ध महागद्दार असा सामना रंगलेला पहायला मिळाला. शिंदे गटाने या वादात शरद पवारांचे नाव घेतल्यानंतर राऊतांनी थेट मोदींनाच या वादात ओढले आहे.

संजय राऊत यांनी शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. गिरणा अॅग्रो नावाने १७८ कोटी २५ लाखांचे शेर्स शेतकऱ्याकडून गोळा केले.पण कंपनीच्या वेबसाईटवर केवळ १ कोटी ६७ लाखांचे शेअर्स केवळ ४७ सभासदांच्या नावावर दाखवले. ही लूट आहे. लवकरच स्फोट होईल’, असा आरोप केला होता. त्यामुळे भुसेंनी आज विधानसभेत संजय राऊतांना महागद्दार म्हणताना “भाकरी खायची मातोश्रीची आणि चाकरी करायची राष्ट्रवादी आणि पवारांची” असा टोला लगावला होता. तर शंभुराजे देसाई यांनी हे संजय राऊत आमच्या मतांवर निवडून आले आहेत आणि आम्हालाच बोलतात. आम्ही सभागृहाचे सदस्य आहोत. राऊत आम्हाला ‘डुक्कर’, ‘गटाराचं पाणी’, असे बोलतात. राऊतांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा देऊन परत निवडून येऊन दाखवावं, असे खुले आव्हान दिले होते. याला राऊत यांनी आपल्या शैलीत चोख प्रत्युत्तर दिले आहे.”मी चौथ्यांदा राज्यसभेवर निवडून गेलो आहे. मी तुमच्या मतांवर निवडून आलो नाही, ती मतं शिवसेनेची होती,” असे संजय राऊत यांनी शिंदे गटाला बजावले आहे. तर शरद पवारांच्या जवळीकते बद्दल बोलताना मला शरद पवारांचे चाकर म्हणता. पण तुम्ही उद्धव ठाकरेंचे असताना ‘मोदी आमचा बाप आहे’, असं म्हणता, ते चालतं का, याचं उत्तर आधी द्या, असे संजय राऊतांनी म्हटले आहे. यावेळी शिंदे गटाला त्यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन परत निवडून येण्याचे आव्हान दिले आहे.
राज्यात कायदा सुव्यवस्था राहिली नसल्याचे त्यांनी म्हटले तर चुंबन प्रकरणावर एसआयटी स्थापन होतेय पण बार्शीतल्या प्रकरणांमध्ये कुठली कारवाई होत नाही अशी खंत व्यक्त करत संजय राऊत यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले होते. पण त्यामुळे राऊतांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.