‘मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्याल तर सरकारला सत्तेतून खेचू’
ओबीसी नेत्यांचा सरकारला इशारा, छत्रपतींनाही प्रत्युत्तर, या शहरात होणार ओबीसी मेळावा, जरांगे पाटील यांना टोला
मुंबई दि १९(प्रतिनिधी)- मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या बराच गाजतो आहे. त्यातच मंत्री छगन भुजबळ यांनी प्रक्षोभक वक्तव्य केल्याने मराठा विरूद्ध ओबीसी संघर्ष होण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली. तर मंत्री छगन भुजबळ यांच्यासह सर्वच ओबीसी नेत्यांनी या मागणीला विरोध केला आहे.
ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनीही जरांगेच्या मागणीवरून सरकारला इशारा दिला आहे. ते म्हणाले की, मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही. मात्र, जरांगे ओबीसीतून आरक्षण मागत आहेत, त्याला आमचा विरोध आहे. सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यास आमचा कायम विरोध आहे. सरकारने तसा जीआर काढला तर आम्ही कोर्टामध्ये जाऊ. तसेच २०२४ ला सरकारला खाली खेचू,असा इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिला आहे. बीडमधील आंदोलक आमचे नसल्याचे मनोज जरांगे म्हणाले. एक महिन्या नंतरही मास्टर माईंड सापडला नाही. ओबीसी समाज दहशती खाली आहे. यामागे कोणी राजकीय व्यक्ती आहे का, याचा शोध घ्यावा, अशीही मागणी प्रकाश शेंडगे यांनी केली आहे. मराठा समाजाला हे ५० टक्क्यांच्या वर वेगळं आरक्षण करून द्या. आता मराठा समाजाची जी आंदोलन सुरू आहेत, ती ओबीसी समाजावर अन्याय करणारी आहेत. मराठा समाजाने आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांऐवजी ६५ टक्के करण्यासाठी आंदोलन करावे. त्यासाठी आम्हीही तुमच्यासोबत राहू. पण, तुम्ही ओबीसीतून आरक्षण मागताय, हे चुकीचं आहे. तसेच आता छगन भुजबळ यांना लक्ष्य केले जात आहे. ओबीसी समाजाला भीतीतून बाहेर काढण्यासाठी मेळावा घेतला. आता यापेक्षा मोठा मेळावा हिंगोली येथे होणार आहे. तेथे बावनकुळे यांनाही बोलावले आहे. त्यांच्यासह अनेक नेते उपस्थितीत राहील, असे शेंडगे यांनी सांगितले आहे. दरम्यान मराठा नेते भुजबळांवर टीका करत असताना संभाजीराजांनी बोलणे गरजेचे होते. ओबीसी नेत्याने परखड भूमिका मांडली असेल तर त्यावर संभाजीराजेंनी वाईट वाटून घेऊ नये, असं आवाहन शेंडगे यांनी केले आहे.
पंकजा मुंडे यांना भाजपने पाठवले नाही, हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी भडकाऊ भाषण केले नाही. यावेळी शेंडगे यांनी मनोज जरांगे यांच्यावर खोचक शब्दात टिका केली. खरंतर मनोज जरांगे यांच्यामुळे माळी समाजाचा फुल व्यवसाय वाढला. त्यांनी अशाच सभा घ्याव्यात असा टोला शेंडगे यांनी लगावला आहे.