Latest Marathi News
Ganesh J GIF

अजित पवार गटाचे शिंदे गटानंतर भाजपासोबत खटके

महायुतीत बेबनाव, आगामी निवडणूकीत फटका बसणार, भाजपाच्या कार्यक्रमाला अजित पवार गटाचा विरोध, शिंदे गटही अस्वस्थ

पुणे दि १९(प्रतिनिधी)- राज्यात अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंडखोरी करत भाजपाला साथ दिली आहे. तसेच भाजपाने त्यांना सत्तेत सामील करुन घेत उपमुख्यमंत्रीपद आणि महत्वाची खाती देखील दिली आहेत. पण स्थानिक पातळीवर मात्र भाजपा आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मात्र उघडपणे एकमेकांना विरोध करताना दिसत आहेत. त्यामुळे युतीत बेबनावाची स्थिती आहे.

सनातन धर्म आणि हिंदुत्वाची प्रखर भूमिका मांडणारे बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या दरबारात भाजपचे मंत्री दररोज हजेरी लावत असतात. आता सोमवारी म्हणजे २० नोव्हेंबरपासून पुण्यात बागेश्वर महाराजांच्या दिव्य दरबारचे आयोजन करण्यात आले आहे. अर्थात त्याला अंनिसने विरोध केला आहे. पण आता अजित पवार गटाने देखील याच्या विरोधात भुमिका घेतली आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर अजित पवार गट विरूद्ध भाजपा वादाची चिन्हे आहेत. पुणे भाजपच्या माजी शहराध्यक्षांनी म्हणजे जगदीश मुळीक यांनी पंडित धीरेद्र शास्त्री उर्फ बागेश्वर धाम सरकार यांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. पुणे शहरात बागेश्वर धाम महाराज यांचा कार्यक्रम २० ते २२ नोव्हेंबर रोजी जगदीश मुळीक फाउंडेशनकडून आयोजित केला आहे. भाजपचे माजी शहराध्यक्ष यांनी यासंदर्भातील बॅनर्स शहरात लावले आहे. हनुमान कथा सत्संग हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच यावेळी बागेश्वर महाराजांचा दिव्य दरबारही भरणार आहे. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत. परंतु या कार्यक्रमास अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीकडून विरोध करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोशल मीडिया सेलचे प्रदेशाध्यक्ष सुदर्शन जगदाळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून या कार्यक्रमास विरोध केला आहे. जगद्गुरू संत तुकारामांच्या भूमीत असल्या भोंदू बाबांना थारा नाही, अशी पोस्ट जगदाळे यांनी करत कार्यक्रमास विरोध दर्शवला आहे. अजितदादा गट आणि भाजप सत्तेत एकत्र असताना अजितदादा गटाकडून भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला विरोध दर्शविला जात आहे. त्यामुळे हा बेबनाव आगामी निवडणुकीच्या काळात पक्षाला मारक ठरण्याची शक्यता आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वीच छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील बागेश्वर महाराज यांचा भव्य कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी पुढाकार घेतला होता. हा कार्यक्रम देखील चांगलाच चर्चेत आला होता.

अजित पवार आणि त्यांचा गट सत्तेत सामील झाल्यापासून त्यांचे आणि शिंदे गटाचे कायमच खटके उडाले आहेत. अजित पवार यांनी थेट एकनाथ शिंदे यांच्या खात्यावरच अतिक्रमण केले होते. पण त्यानंतर पुण्याचे पालकमंत्री पद भाजपासाठी महत्वाचे होते. पण अजित पवार गटाने तेथे देखील नाराजीचे अस्त्र बाहेर काढत आपल्याकडे खेचले होते. त्यामुळे भाजपाचे स्थानिक नेते नाराज आहेत. तसेच सहकार्य न करण्याची भुमिका घेतली जात आहे. त्यामुळे आगामी काळात अजित पवार गटाच्या वेगळ्या भूमिकेमुळे महायुतीत बेबनाव आणि वादाची स्थिती होण्याची शक्यता आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!