
तरुण महिला आमदाराचा तडकाफडकी आमदारकीचा राजीनामा
राजीनामा देत घेतली राजकारणातून निवृत्ती, दु:खी मनाने राजकारण सोडण्याचा निर्णय, नक्की काय घडले?
चंदीगड – आम आदमी पक्षाच्या (आप) नेत्या आणि पंजाबमधील आमदार अनमोल गगन मान यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देत राजकारणातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे.
सोशल मीडियावर पोस्ट करत अनमोल गगन मान यांनी म्हटलं की, ‘जड अंतःकरणाने मी राजकारण सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मी आमदारपदाचा राजीनामा सभापतींकडे पाठवला आहे. मी त्यांना तो स्वीकारण्याची विनंती करते. माझ्या शुभेच्छा पक्षासोबत आहेत. मला विश्वास आहे की पंजाब सरकार लोकांच्या अपेक्षा पूर्ण करेल. अनमोल गगन मान या प्रसिद्ध पंजाबी गायिका आणि अभिनेत्री आहेत. २०२० मध्ये त्या आम आदमी पक्षामध्ये सहभागी झाल्या होत्या. २०२२ च्या विधानसभेच्या निवडणूकीत त्यांनी पक्षाने तिकीट दिले होते. मोहालीतील खरार विधानसभा मतदारसंघातून अनमोल गगन मान आमदार म्हणून निवडून आल्या. त्यावेळी आप पक्षाच्या त्या सर्वात तरुण आमदार ठरल्या होत्या. त्यांच्याकडे पर्यटन आणि संस्कृती विभागाची जबाबदारी देण्यात आली होती. २०२४ साली भगवंत मान यांनी त्यांना मंत्रिमंडळातून वगळले होते. त्यामुळे, या निर्णयाची चर्चा होत आहे. विशेष म्हणजे चार दिवसांपूर्वी, १५ जुलै रोजी त्यांनी आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली होती. त्यांनी X वर याबद्दल पोस्ट देखील केली होती. त्यांनी लिहिले होते की, ‘राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यासोबत विविध प्रमुख मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली’ पण आता त्यांनी राजीनामा दिला आहे. अनमोल गगन मान यांचा राजीनामा आप पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे, कारण त्यांनी पंजाबमध्ये ‘आप’ला मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. मान एक लोकप्रिय नेते होत्या. तर तरुण पिढीमध्ये त्यांची एक विशेष ओळख आहे. त्यांचा राजीनामा अध्यक्षांनी स्वीकारल्यास पंजाबमध्ये आणखी एक पोटनिवडणूक होईल असे म्हटले जात आहे.
अनमोल गगन मान यांचा जन्म १९९० मध्ये मानसा येथे झाला. चंडीगडमध्ये त्यांनी शिक्षण पूर्ण केले. सुरूवातीला माॅडलिंग आणि नंतर त्या गायनाकडे वळल्या. अनमोल गगन मान यांनी १६ जून २०२४ रोजी वकील शाहबाज सिंह सोही यांच्याशी लग्न केले. शाहबाज सिंह हे पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयामध्ये वकील आहेत.