Just another WordPress site

एकनाथ शिंदे यांच्यासह 7 जणांचं मंत्रिपद धोक्यात, 24 तासात कारवाई होणार…?

मुंबई  प्रतिनिधी   : शिवसेनेच्या 38 आमदारांनी बंडखोरी करत उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडावं, अशी मागणी केली आहे. शिवसेनेचे ते आमदार सूरतमार्गे आसाममधील गुवाहाटीमध्ये पोहोचले आहेत. शिवसेनेकडून बंडखोर आमदार आणि मंत्री यांच्या विरोधात कारवाईचं सत्र सुरु करण्यात आलं आहे. 16 आमदारांची आमदारकी रदद् करण्यासाठी विधानसभा उपाध्यक्षांनी नोटिसा पाठवल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून आता मंत्र्यांवर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री कार्यालयातून राज्यपाल कार्यालयाला यासंदर्भातील पत्र पाठवली जाणार असल्याची माहिती कळतेय.

GIF Advt

महाराष्ट्राच्या 7 मंत्र्यांना बरखास्त करण्यात यावं, असं पत्र मुख्यमंत्री कार्यालयातून राज्यपाल कार्यालयाला पाठवलं जाण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील, दादा भुसे, संदिपान भुमरे, शंभूराज देसाई, बच्चू कडू, अब्दुल सत्तार यांचं मंत्रिपद बरखास्त करण्यासाठी राज्यपाल कार्यालयाला पत्र दिलं जाईल, अशी माहिती आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना यासंदर्भातील संकेत दिले. जे लोक गेले आहेत त्यांच्यावर येत्या 24 तासात कारवाई केली जाईल, असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल शिवसेनेच्या तालुकाप्रमुख, जिल्हा प्रमुख आणि नगरसेवकांची बैठक घेतली. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांबाबत आक्रमक भूमिका घेतली. शिवसेनेनं काल रात्री 16 आमदारांवर कारवाई करण्यासाठी विधानभवनात कायदेतज्ज्ञांसह तळ ठोकला होता. आज विधानसभा उपाध्यक्षांनी आज सेनेच्या १६ आमदारांना सोमवारी सायंकाळी 05.30 वाजेपर्यंत उत्तर देण्यासाठी नोटीस देण्यात आली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!