
मुंबई विशेष प्रतिनिधी – महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष दिवसेंदिवस आणखी गडद होत चाललं आहे. शिवसेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आल्यामुळे महाविकास आघाडी सरकारचं अस्तित्व धोक्यात आलं आहे. शिवसेनेचे प्रबळ नेते आणि महाविकास आघाडीतील मंत्री एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांसह बंड केला. या सर्वांना आसाममधील गुवाहाटीतील रॅडिसन हॉटेलमध्ये मुक्काम ठोकला आहे. अशातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून सर्व बंडखोर आमदारांना वारंवार आवाहन केलं जात आहे. पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी सर्व बंडखोर आमदारांना आवाहन केलं आहे.

“आपण गेल्या काही दिवसांपासून गुवाहाटी येथे अडकून पडलेले आहात. आपल्या बाबत रोज नवीन माहिती समोर येत आहे, आपल्यातील बरेच संपर्कातही आहेत. आपण आजही मनानं शिवसेनेत आहात. आपल्यापैकी काही आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांनी देखील संपर्क साधून आपल्या मनातील भावना मला कळवल्या आहेत. आपल्या भावनांचा मी शिवसेनेचा कुटुंबप्रमुख म्हणून आदर करतो. कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो, अजुनही वेळ गेलेली नाही, माझं आपल्याला सगळ्यांना आवाहन आहे, आपण या माझ्यासमोर बसा, शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा, यातून निश्चित मार्ग निघेल.”, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना आवाहन केलं आहे.

“आपण एकत्र बसून यातून मार्ग काढू. कोणाच्याही कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका, शिवसेनेनं जो मान सन्मान तुम्हाला दिला, तो कुठेही मिळू शकत नाही, समोर आलात बोललात तर मार्ग निघेल.

शिवसेना पक्षप्रमुख आणि कुटुंबप्रमुख म्हणून आजही मला तुमची काळजी वाटत आहे. समोर येऊन बोला आपण मार्ग काढू.”, अशी भावनिक सादही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सर्व बंडखोर आमदारांना घातली आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या 16 बंडखोर आमदारांना अपात्रतेच्या नोटिसीसंदर्भात उत्तर देण्यासाठी 12 जुलैपर्यंत मुदत दिली आहे. त्यामुळे हे राजकीय महानाट्य अजून लांबण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. अशातच भाजपकडूनही खलबतं सुरु आहेत. पण सध्या आमची भूमिका वेट अँड वॉचचीच, अशी प्रतिक्रिया भाजप नेत्यांकडून दिली जात आहे. अशातच आता हा सत्तासंघर्ष कोणतं वळण घेणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

