मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह १६ आमदार अपात्र ठरणार?
सर्वोच्च न्यायालयाची राहुल नार्वेकरांना नोटीस, आपली बाजू मांडण्याचे निर्देश, काय घडले न्यायालयात
मुंबई दि १४(प्रतिनिधी)- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत लवकरच निर्णय लागण्याची शक्यता आहे. कारण ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. यामध्ये १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात निर्णय घेण्यासाठी सध्या कोणती प्रक्रिया सुरु आहे याची माहिती १४ दिवसात देण्याचे आदेश देण्यात आला आहेत.
शिवसेनेच्या फुटीनंतर ठाकरे गटाकडून १६ आमदारांच्या अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यावेळी न्यायालयाने याचे निर्णय घेण्याचे अधिकार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले होते. त्याचबरोबर लवकर निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. या सुनावणीला आता तीन महिने होत आले तरी विधानसभा अध्यक्षांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे ठाकरे गटाच्या सुनील प्रभू यांनी विधानसभा अध्यक्षांविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत निर्णय घेण्याची विनंती केली होती. त्यावर आज सुनावणी घेताना सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना दोन आठवड्यांमध्य उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. पण यामुळे शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील मुद्दा लवकरच निकाली निघण्याची शक्यता आहे. एकंदरीत न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार राहुल नार्वेकर यांना ११ ऑगस्टच्या आधी १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घ्यावा लागण्याची शक्यता आहे.
विधानसभा अध्यक्षांनी शिंदे गटाच्या १६ आमदारांना अपात्र ठरवल्यास महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे पुन्हा बदलू शकतात. पण जर अपात्र न ठरवल्यास ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.