कर्ज फेडण्यासाठी होती ४० लाखांची गरज ; तरुणाने थेट ॲक्सिस बँकेत घातला दरोडा, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यात एका व्यक्तीने बँकेत घुसून ४० लाख रुपये लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी माहिती मिळताच बँक मॅनेजरच्या तक्रारीवरून एफआयआर नोंदवला आहे. तसेच बँक कर्मचाऱ्यांची चौकशी केली. सीसीटीव्ही फुटेज तपासलं जात असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल असंही सांगितलं.
एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, शस्त्र असलेल्या गुन्हेगाराने मंगळवारी शामली जिल्ह्यातील ॲक्सिस बँकेच्या शाखेतून ४० लाख रुपयांची रोकड लुटली. ॲक्सिस बँकेचे मॅनेजर नवीन जैन यांनी पोलिसांना सांगितलं की, मास्क लावलेला एक व्यक्ती माझ्या केबिनमध्ये आला आणि त्याने मला बंदुकीच्या धाक दाखवून बाहेर नेलं नेले आणि मला ४० लाख रुपयांची रोकड आणण्यास सांगितलं.
रोख रक्कम दिली नाही तर जीवे मारेन, अशी धमकी व्यक्तीने मॅनेजरला दिली. मॅनेजरने सांगितलं की, कॅशियर रोहितला रोख रक्कम आणण्यास सांगितलं. रोख रक्कम आणली नाही तर आरोपी आत्महत्या करेल किंवा मॅनेजरची हत्या करेल, असंही आरोपीने मॅनेजरला सांगितलं. यानंतर त्याने मॅनेजरला कर्ज फेडण्यासाठी पैशांची गरज असल्याचं सांगितलं. कॅशियर रोहित यांच्याकडून रोख रक्कम घेऊन आरोपी बाईकवरून पळून गेला. त्याचवेळी पोलीस अधीक्षक राम सेवक गौतम यांनी सांगितलं की, त्यांनी सीसीटीव्ही फुटेज गोळा केलं असून त्याचा तपास सुरू आहे. तसेच ॲक्सिस बँकेचे मॅनेजर नवीन जैन आणि बँक कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात येत आहे. पुढील तपास सुरू आहे.