
TCS लैंगिक छळ प्रकरण: आरोपी निदा खानला २-३ दिवस का दिली होती रूम?; नगरसेवक मतीन पटेलांनी सांगितली ‘इनसाईड स्टोरी’
नाशिकमधील बहुचर्चित टीसीएस लैंगिक शोषण आणि धर्मांतरण प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान हिच्या अटकेनंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. निदा खान हिला आश्रय दिल्याच्या आरोपामुळे एमआयएम (MIM) नगरसेवक मतीन पटेल सध्या कायदेशीर कचाट्यात सापडले आहेत. नाशिकच्या विशेष तपास पथकाने या प्रकरणात मतीन पटेल यांची पुन्हा एकदा कसून चौकशी केली. या चौकशीनंतर पटेल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपली बाजू मांडली असून विरोधकांच्या आरोपांना सडेतोड उत्तर दिले आहे.

“इम्तियाज जलील यांचा या प्रकरणाशी काहीच संबंध नाही”

शिंदे सेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आरोप केला होता की, मुख्य आरोपी निदा खान ही एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांची नातेवाईक आहे. या आरोपाचा मतीन पटेल यांनी तीव्र शब्दांत इन्कार केला.आपली भूमिका स्पष्ट करताना पटेल म्हणाले: “मी पोलिसांना स्वतः सांगितले की मला इम्तियाज जलील यांना कॉल करू द्या. या प्रकरणाबाबत जलील यांना कोणतीही पूर्वकल्पना नव्हती. ते माझे नेते आहेत, त्यामुळे मला कोणतीही अडचण आली की मी त्यांना फोन करतो. पण निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातेवाईक नाही. जो कोणी असा दावा करत आहे, तो पूर्णपणे खोटं बोलत आहे.”

पालकमंत्र्यांवर साधला निशाणा; फोन रेकॉर्डिंगचा दावा
“नाशिकच्या पालकमंत्र्यांचं इम्तियाज जलील यांच्यावर विशेष प्रेम आहे, म्हणूनच ते सारखं सारखं या प्रकरणात जलील यांचं नाव ओढत आहेत,” असा टोला मतीन पटेल यांनी लगावला. पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, निदा खान जेव्हा त्यांच्याकडे वास्तव्याला होती, तेव्हा इम्तियाज जलील यांच्याशी त्यांचा एकही फोन कॉल झाला नाही. “माझ्या फोनमध्ये सर्व कॉल रेकॉर्डिंग सुरक्षित आहेत. मी काहीही चुकीचे केलेले नाही, त्यामुळे या प्रकरणात मी कोर्टात कायदेशीर लढा देणार,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
“मला माहित नव्हतं निदा खान कोण आहे…”
आरोपी निदा खानशी आपली कोणतीही जुनी ओळख नव्हती, असा दावा मतीन पटेल यांनी केला आहे. निदा खानला आश्रय कसा मिळाला, यावर बोलताना ते म्हणाले:निदा खान थेट माझ्या कार्यालयात आली होती. मला ती कोण आहे, हे माहित नव्हते.तिच्या आई-वडिलांनी मला फोन करून विनंती केली होती आणि त्यानंतर निदाचाही फोन आला. त्यामुळे मी तिला मानुसकीच्या नातेने २ ते ३ दिवसांसाठी रूम उपलब्ध करून दिली होती.
घरे तोडल्याचा प्रशासनावर गंभीर आरोप
या प्रकरणात प्रशासनाकडून होत असलेल्या कारवाईवर मतीन पटेल यांनी गंभीर आक्षेप घेतले आहेत. “या संपूर्ण प्रकरणात मी ज्या लोकांना माझे घर विकले होते, त्यांना देखील पोलिसांनी विनाकारण आरोपी केले आहे. इतकेच नाही तर त्यांचे घर देखील तोडण्यात आले आहे,” असा खळबळजनक आरोप मतीन पटेल यांनी शेवटी केला.एसआयटीच्या या सलग चौकशीमुळे आणि मतीन पटेल यांच्या दाव्यांमुळे नाशिकमधील या संवेदनशील प्रकरणाला आता कोणते नवे वळण मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

