Latest Marathi News
Ganesh J GIF

तुकाराम मुंढेंच्या ‘होम ग्राऊंड’वर भेसळखोरांचे धाबे दणाणले! बीडमध्ये लस्सी साठा नष्ट, सोयाबीन तेल जप्त

अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आपल्या कडक शिस्तीचा दणका आता स्वतःच्याच जिल्ह्यात दाखवायला सुरुवात केली आहे. बीड जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाकडून (FDA) विविध ठिकाणी धडक धाडसत्र सुरू करण्यात आले असून, यामुळे भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत.

मुदतबाह्य पदार्थांपासून लस्सी निर्मिती; साठा नष्ट

बीड शहराजवळ असलेल्या एका प्रसिद्ध लस्सी उत्पादन केंद्रावर प्रशासनाने छापा टाकला. या कारवाईत धक्कादायक बाब समोर आली असून, लस्सी तयार करण्यासाठी मुदत संपलेले (Expired) अन्नपदार्थ वापरले जात असल्याचे उघडकीस आले. प्रशासनाने तत्परता दाखवत या ठिकाणचा १०० लीटरहून अधिक लस्सीचा साठा जागीच नष्ट केला आणि केंद्र चालकावर कडक कारवाईचा बडगा उगारला.

तेल जप्त आणि दूध केंद्रांची तपासणी

या धडक मोहिमेअंतर्गत फक्त लस्सीच नाही, तर इतर खाद्यपदार्थांवरही कारवाई करण्यात आली आहे. माजलगाव येथे संशयास्पद रिफाइंड सोयाबीन तेलाचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे.शिरूर परिसरातही अशीच अन्नपदार्थांची तपासणी आणि जप्तीची कारवाई करण्यात आली.पाटोदा तालुक्यातील दोन मोठ्या दूध संकलन केंद्रांची अचानक तपासणी करण्यात आली. येथील दुधाचे नमुने घेऊन ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

थोडक्यात काय तर… तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून भेसळखोरांविरोधात मोहीम तीव्र केली आहे. आता त्यांच्याच गृहजिल्ह्यात झालेल्या या मोठ्या कारवाईमुळे संपूर्ण बीड जिल्ह्यातील भेसळयुक्त व्यापार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!