सांगलीतील ४० गावे कर्नाटक राज्यात सामील होणार?
कर्नाटक मुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य, महाराष्ट्रातून संतप्त प्रतिक्रिया
मुंबई दि २३(प्रतिनिधी)- महाराष्ट्र सरकारने नुकतीच कर्नाटक बरोबरचा सीमाप्रश्न सामंजस्याने सोडवण्यासाठी दोन मंत्र्यांची नियुक्ती केली आहे. पण कर्नाटकने कुरापत काढत सीमा भागातील मराठी गावं महाराष्ट्रात येणे तर सोडाच पण आता कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातील आणखी ४० गावं आपल्या राज्यात समाविष्ट करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी स्वत: तसे संकेत दिले. त्यांच्या वक्तव्याचे महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
सांगलीच्या जत तालुक्यातील ४० दुष्काळग्रस्त गावांनी नुकताच कर्नाटक राज्यात सामील होण्याचा ठराव मंजूर केला होता. या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने ही गावे आपल्या राज्यात आणण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. कर्नाटकच मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी म्हटले की, जत तालुक्यात दुष्काळ आणि भीषण पाणीटंचाई आहे. आम्ही या गावांना पाणी देऊन मदत केली आहे. आता या ४० गावांनी कर्नाटकमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. कर्नाटक सरकार या ठरावाचा गांभीर्याने विचार करत आहे, यावरून कर्नाटक सरकार सीमा प्रश्न सोडवण्याएैवजी महाराष्ट्रातील भागावर वक्रदृष्टी असल्याचे दिसून आले आहे. यामुळे महाराष्ट्रातील सर्वच पक्षांनी निषेध केला असून एक इंचही जमीन कर्नाटकला देणार नसल्याचा इशारा दिला आहे. शिंदे आणि फडणवीसांनीही कर्नाटक सरकारच्या या निर्णयाचा निषेध केला आहे.
महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भात सीमा भागातील बांधवांच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने नुकतीच एक समिती नियुक्त केली होती. समन्वयासाठी मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांची नियुक्ती केली होती. पण कर्नाटकच्या तिरक्या चालीने राज्य सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत.