Latest Marathi News
Ganesh J GIF

६ जणांची कोयत्याने गळा चिरून सामूहिक हत्या; विजापूर जिल्ह्यातील थरार

सोलापूर जिल्ह्याला लागून असलेल्या कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन विचलित करणारी घटना समोर आली आहे. विजापूर जिल्ह्यातील चडचण जवळील मौजे निवरगी आणि गोविंदपूर भागात जमिनीच्या वादातून एकाच वेळी ६ जणांची सामूहिक हत्या करण्यात आली आहे. ऊस तोडणीच्या कोयत्याने गळा चिरून हे हत्याकांड घडवण्यात आले असून, या घटनेमुळे सोलापूरसह संपूर्ण विजापूर जिल्हा हादरून गेला आहे.

शुक्रवारी दुपारच्या सुमारास हे हत्याकांड घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, मृतांमध्ये एकाच कुटुंबातील ५ जणांचा समावेश आहे.या भीषण हल्ल्यात मृत्यू झालेल्या दुर्दैवी नागरिकांची नावे रेवणसिद्धप्पा नीराळे, दुंडप्पा रेवणसिद्धप्पा नीराळे, शिवपुत्र नीराळे, चंद्रशेखर नीराळेराहुल नीराळे (सर्व रा. चडचण, जि. विजापूर), शब्बीर अत्तार (लाकूड व्यावसायिक) अशी आहेत

१५ वर्षांचा वाद अन् २५ एकर जमीन ठरली काळ!

मिळालेल्या माहितीनुसार, चडचण येथील नीराळे कुटुंबाने काही महिन्यांपूर्वी मौजे निवरगी येथील तेली कुटुंबाकडून सुमारे २५ एकर शेतजमीन विकत घेतली होती. या जमिनीवरून निवरगी येथील तेली कुटुंब आणि गोविंदपूर येथील आरोपी यांच्यात गेल्या १५ ते १६ वर्षांपासून तीव्र वाद सुरू होता. या वादामुळेच तेली कुटुंबाने मागील १५ वर्षांपासून या जमिनीवर शेती केली नव्हती. हीच वादग्रस्त जमीन नीराळे कुटुंबाने खरेदी केली आणि हाच निर्णय त्यांच्यासाठी काळ ठरला.

शेतात पाऊल ठेवताच झाला भीषण हल्ला

शुक्रवारी दुपारी चडचण येथील नीराळे कुटुंबातील सदस्य ही नवी शेतजमीन पाहण्यासाठी आणि तिथली झाडेझुडपे स्वच्छ करण्यासाठी गेले होते. शेतातील लाकडे कापून विकण्याच्या उद्देशाने त्यांनी चडचण येथील लाकूड व्यावसायिक शब्बीर अत्तार यांनाही आपल्यासोबत घेतले होते.परंतु, नीराळे कुटुंब आणि अत्तार यांनी वाद असलेल्या या शेतजमिनीवर पाऊल ठेवताच, दबा धरून बसलेल्या आरोपींनी त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला. ऊस तोडणीसाठी वापरण्यात येणाऱ्या धारदार कोयत्याने आरोपींनी सर्वांवर सपासप वार केले. हा हल्ला इतका भीषण आणि क्रूर होता की, ६ जणांचा जागीच तडफडून मृत्यू झाला.

गोळीबार झाला का? संशय कायम

घटनास्थळावर सुरुवातीला गोळीबार झाल्याचीही चर्चा होती. मात्र, पोलिसांनी मृतदेहांची वरवर पाहणी केली असता, त्यावर गोळ्या लागल्याच्या स्पष्ट खुणा आढळलेल्या नाहीत. त्यामुळे आरोपींनी केवळ कोयत्याने वार करूनच ही हत्या केली की गोळीबारही केला होता, हे शवविच्छेदन (Post-Mortem) अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

पोलीस घटनास्थळी दाखल, पंचनामा सुरू

या सामूहिक हत्याकांडाची माहिती मिळताच विजापूर पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी आणि पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहे. पोलिसांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला असून मृतदेहांचा पंचनामा सुरू केला आहे. सीमाभागात घडलेल्या या अत्यंत क्रूर हत्याकांडामुळे सोलापूर आणि कर्नाटकातील सीमावर्ती गावांमध्ये भीतीचे आणि तणावाचे वातावरण पसरले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!