Latest Marathi News
Ganesh J GIF

भोंदू मनोहर मामा प्रकरणात ‘आमदार’ कनेक्शन?

स्वतःला संत बाळूमामांचा अवतार सांगून भक्तांची फसवणूक करणाऱ्या करमाळा तालुक्यातील घोटी येथील भोंदू बाबा मनोहर भोसले उर्फ ‘मनोहर मामा’ प्रकरणाला आता एक वेगळे आणि राजकीय वळण मिळाले आहे. या प्रकरणात करमाळा पोलिसांनी मोठी कारवाई करत कोल्हापूरच्या अविनाश कोतोलीकर याला अटक केली आहे. न्यायालयाने आरोपीला ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, या अटकेमुळे आता या प्रकरणात थेट आमदारांचे धागेदोरे तर समोर येणार नाहीत ना? असा मोठा सवाल उपस्थित केला जात आहे.

आमदाराच्या स्वीय सहाय्यकाला अटक

अटक करण्यात आलेला अविनाश कोतोलीकर हा एका बड्या आमदाराकडे स्वीय सहाय्यक (Personal Assistant – PA) म्हणून कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. करमाळा पोलिसांनी कोतोलीकर याला सलग तीन दिवस पोलीस ठाण्यात बोलावून कसून चौकशी केली होती. तीन दिवसांच्या चौकशीनंतर चौथ्या दिवशी पोलिसांनी त्याला रीतसर ताब्यात घेत अटक केली. एका आमदाराच्या पीएलाच अटक झाल्याने राजकीय वर्तुळात आणि मनोहर मामाच्या भक्तगणांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

३० हजार रुपये घेत ‘लाल पावडर’ देऊन फसवणूक!

घोटी येथील रहिवासी दिलीप राऊत यांनी दिलेल्या तक्रारीवरून मनोहर भोसले आणि त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादीनुसार, मनोहर मामाच्या मठात भेटण्यासाठी सुरुवातीला ११ हजार रुपये घेण्यात आले होते. त्यानंतर फिर्यादीच्या मुतखड्याचा (Kidney Stone) आजार पूर्ण बरा करतो, असे आमिष दाखवून औषधाच्या नावाखाली आणखी ३० हजार रुपये उकळण्यात आले. आजार बरा करण्यासाठी त्यांना एक ‘लाल रंगाची पावडर’ देण्यात आली होती, ज्याने कोणताही फरक पडला नाही आणि आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

भोंदू बाबाचे ‘राजकीय कनेक्शन’ रडारवर?

मनोहर मामा स्वतःला बाळूमामांचा अवतार सांगून राज्यातील अनेक बड्या नेत्यांसोबतचे फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध करत असे. आता त्याच्या खासमखास साथीदाराला आणि आमदाराच्या पीएला अटक झाल्यामुळे, मनोहर मामाचे नेमके कोणते राजकीय कनेक्शन होते? आणि या फसवणूक रॅकेटमध्ये कोणत्या लोकप्रतिनिधींचा वरदहस्त होता का? यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

‘या’ कडक कायद्यान्वये गुन्हे दाखल

करमाळा पोलिसांनी या प्रकरणी मुख्य आरोपी मनोहर भोसले, नाथबाबा आणि एका अनोळखी चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या विविध कलमांसह महाराष्ट्र नरबळी, अघोरी प्रथा आणि काळी जादू प्रतिबंधक व उच्चाटन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात येत्या काळात आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!