उस्मानाबाद जिल्ह्यातील एका शेतकऱ्याची नापिकीला कंटाळून आत्महत्या
राज्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र पुन्हा सुरु, अवकाळी नापिकीमुळे शेतकरी हताश
उस्मानाबाद दि २७( सतीश राठोड )- सततच्या नापिकीला कंटाळून व मुलीच्या लग्नासाठी नातेवाईकाकडून उसनवारीने घेतलेले पैसे परतफेड कसे करावेत या आर्थिक विवंचनेतून कंटाळून तुळजापूर तालुक्यातील आणदुर पुजारी तांडा येथील एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे .
अशोक काशीराम राठोड वय वर्ष 55 असे या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे . स्वताची व आणदुर शिवारातील एका शेतकऱ्याची शेती तो बटाईने कसत होता. नेहमीप्रमाणे तो 27 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास आणदुर शिवारात बटाईने कसून खाण्यासाठी एका शेतकऱ्यांच्या शेतात जनावरांना चारापाणी करण्यासाठी तो गेला होता . कुटुंबीयाने तो घरी जेवणासाठी आलाच नाही म्हणून त्यांना फोन करीत होते मात्र तो फोन उचलत नव्हता फोन का उचलत नाही म्हणून कुटुंबीयांनी शेतात येऊन त्यांचा शोध घेतला असता तो एका लिंबाच्या झाडावर सुताच्या दोरीने गळफास घेऊन लोंबकळत असल्याचे दिसून आले हि माहिती येथील ग्रामस्थांना व नातेवाईकांना कळाली. नातेवाईक व कुटुंबीय आक्रोश होवून घटनास्थळी धाव घेऊन मोठी गर्दी केली होती . सततच्या नापिकेला कंटाळून हातबल होऊन आत्महत्या केलेल्या या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयास शासनाने मदत करावी अशी मागणी होत आहे . त्यांच्या कुटुंबात पत्नी दोन मुलं सुन असा परिवार आहे .
सदर घटनेची माहिती नळदुर्ग पोलिसांना कळताच नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणदुर बीटचे पोलीस कॉन्स्टेबल शिंदे , सोनवणे घटनास्थळी धाव घेऊन सदर घटनेचा पंचनामा केला . पुढील तपास नळदुर्ग पोलीस करीत आहेत .