पुणे दि ६(प्रतिनिधी) – काही काळ विश्रांती घेतलेल्या पावसाने राज्यात पुन्हा संततधार सुरु केली आहे. राज्यातील काही भागात मागच्या दोन दिवसांपासून कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. आता पुन्हा पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे गरज असेल तरच बाहेर पडा अस आवाहन प्रशासनाने केले आहे.
पुढील चार दिवसात राज्यातील कोल्हापूर, सातारा, पुणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, मुंबई, नाशिक, ठाणे, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या भागात हवामान विभागाने ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. या भागांत अतिमुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. उर्वरित भागातही मुसळधार पाऊस पडणार आहे. राज्यात गेल्या दोन दिवसांपासून मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. बंगालच्या उपसागरातील मध्य पूर्व आणि उत्तर पश्चिम भागात ७ ऑगस्टला कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे. यामुळे पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. सध्या बंगालच्या उपसागरापासून ते आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टीपर्यंत हवेच्या वरच्या भागात द्रोणीय स्थिती तयार झाली होती. त्यामुळे राज्यात पाऊस सक्रिय झाला आहे.
जून महिन्यात दडी मारलेल्या पावसाने जुलै महिन्यात राज्याला झोडपून काढले होते. आता या महिन्याच्या सुरुवातीलाच कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही जिल्ह्यांत अतिमुसळधार पाऊस बरसणार आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे.