‘अजित पवार घोटाळेबाज, त्यांना कधीही अटक होऊ शकते’
माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचा मोठा आरोप, सुप्रिया सुळेंना अध्यक्ष करण्याचा सल्ला
मुंबई दि ४(प्रतिनिधी)- शरद पवारांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याची सांगत निवृत्तीची घोषणा केली. सध्या त्यांनी या निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी कार्यकर्त्यांकडे वेळ मागितला आहे. पण त्याचबरोबर दुसरा अध्यक्ष कोण? यावर देखील खल होताना दिसत आहे. पक्षाध्यक्षपदासाठी अजित पवार की सुप्रिया सुळे अशी चर्चा सुरू असताना माजी आमदार शालिनीताई पाटील यांनी अजित पवारांवर गंभीर आरोप केले आहेत.
शालिनीताई पाटील म्हणाल्या की, शरद पवार यांनी निवृत्ती घेतली आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचा पुढचा अध्यक्ष ठरवायचा असेल तर सुप्रिया सुळेंकडेच ते पद जावं. कारण सुप्रिया या पदासाठी सक्षम आहे. अजित पवार हे गुन्ह्यांखाली अडकलेले घोटाळेबाज नेते आहेत. त्यांना राष्ट्रवादीचं अध्यक्षपद देणं चुकीचं ठरेल, आमदार हसन मुश्रीफ यांना १०० कोटींच्या मनी लाँड्रींग प्रकरणात ईडी चौकशीसाठी बोलावते मग अजित पवारांना १४०० कोटींच्या मनी लाँड्रींग प्रकरणात चौकशीसाठी का बोलवत नाही? अजित पवारांच्या पाठिशी भाजपाचा बडा नेता आहे. त्यामुळे अजित पवारांना व्यवस्थित सावली मिळाली आहे. कुठल्याही चौकशीहीसाठी त्यांना बोलावलं जात नाही. मात्र अजित पवारांना कधीही अटक होऊ शकते एवढे गुन्हे आणि आरोप त्यांच्यावर आहेत. असा आरोप शालिनी पाटील यांनी केला आहे. शरद पवार माझ्यापेक्षा १० वर्षांनी लहान आहेत. मी अजूनही कामकाज सांभाळते. त्यामुळेच शरद पवारांनी घाईघाईत निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. शरद पवारांनी निवृत्ती जाहीर केली असली तरीही जोपर्यंत समिती निर्णय घेत नाही तोपर्यंत हा निर्णय मान्य होणार नाही. असे शालिनी पाटील यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘लोक माझे सांगती’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात निवृत्तीची घोषणा केली. पण निवृत्ती जाहीर केल्यानंतर अनेक कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत पवारांनी फेरविचार करण्याची मागणी केली. दरम्यान, शऱद पवार नेमकी काय भूमिका घेतात, हेच पाहणं महत्वाचं आहे.